मुसळधार पावसाने पहूर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:22+5:302021-09-08T04:21:22+5:30
पहूर, ता. जामनेर : मंगळवारी सकाळी संततधार सुरू असताना अचानक त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाल्याने पहूर पेठ व पहूर ...

मुसळधार पावसाने पहूर जलमय
पहूर, ता. जामनेर : मंगळवारी सकाळी संततधार सुरू असताना अचानक त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाल्याने पहूर पेठ व पहूर कसबे अंतर्गत असलेल्या नवीन वसाहतींमध्ये पाणी शिरले. यामुळे अनेकांचे संसार पाण्यात गेले असून दुकांनामध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होता. सकाळी संततधारेचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. जवळपास दोन तास पाऊस सुरू होता. यामुळे शिवनगर, संतोषी मातानगर, सौभाग्य नगर, किसन धोंडू पाटील यांचा वाडा, शांतीनगर, अंजिठा चौफुली परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने जवळ घरे व दुकानांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी होते. यामुळे लाखोंचे संसारोपयोगी साहित्य, दुकानांमधील माल पाण्यात भिजल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंच्या घरात नुकसान झाले.
पाचोरा जंक्शनच्या कामाने दुकाने व घरे असुरक्षित
संतोषी माता नगर भागातून येणाऱ्या नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. नाल्यावर किसन पाटील यांच्या शेताजवळ पाचोरा रस्त्यावर मोरी आहे. या मोरीत सिमेंट पाईप असून अरूंद आहे. पाणी जाण्यासाठी मोकळा प्रवाह पाण्याला मिळत नाही. कचरा पाईपांमध्ये अडकल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला. यामुळे परिसरातील मगन मिस्तरी यांचे फर्निचर दुकान, संदीप घोंगडे यांचे ऑटो गॅरेज, दीपक चौधरी होलसेल, कांदा बटाटा आडत व्यापारी, संदीप दाभाडे ऑटो गॅरेज यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने या व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून याच परिसरातील राजू किसन पाटील व पत्रकार मनोज जोशी यांच्या घरात पाणी शिरले.
विजय जैन यांच्या घराला पाणी लागले होते. याठिकाणी पाचोरा जंक्शनचे रस्त्याचे काम रखडले असून किसन पाटील यांच्या वाड्याजवळ असलेल्या याच मोरीमुळे पाण्याचा प्रवाह दबला आहे. याठिकाणी पाईप काढून रूंद मोरी तयार करण्यात यावी, अन्यथा रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
शांतीनगरात पाणी
कसबेअंतर्गत असलेल्या पाचोरा रस्त्यावरील शांतीनगरातील संजय घोंगडे, कैलास क्षिरसागर, एकनाथ सपकाळ, निलेश पाटील, कैलास चौधरी, रूमशादबी समसोद्दीन तडवी यांच्या घरात पाणी शिरूर घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य पाण्यात गेल्याने संसार उघड्यावर आला आहे. या वसाहतीत अंतर्गत रस्ते उंच व गटारींची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने पाण्याला प्रवाह न मिळाल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याचे या रहिवाशांनी सांगितले आहे. याबरोबरच संतोषी माता नगर, शिवनगर व गोविंद नगर जलमय झाल्याने काहींच्या घरात पाणी शिरले आहे.
पेठ गावाचा संपर्क तुटला
वाघूर नदी पेठ गावातून प्रवाहित आहे. दुसऱ्यांदा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने पेठ गावातील आठवडे बाजारात पाणी शिरले होते. गावातून बसस्टँडवर येणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने तीन तास संपर्क तुटला होता.
परिसरात शेतीचे नुकसान
लोंढ्री, शेरी या भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी शिरून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया
औरंगाबाद रस्त्याकडून येणारी भूमिगत गटारे व पाचोरा जंक्शनचे रखडलेले काम याठिकाणी असलेल्या मोरीतून पाणी प्रवाहित न झाल्याने माझ्यासह आठ ते दहा दुकांनामध्ये पाणी शिरले. माझ्या दुकानातील फर्निचर पाण्यात भिजल्याने पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
मगन मिस्तरी, फर्निचर व्यापारी
070921\07jal_8_07092021_12.jpg
पहूर येथील पाचोरा जंक्शनच्या कामाच्या परिसरातील दुकानांमध्ये शिरलेले पाणी.