Oxygen will also be produced in Chalisgaon | चाळीसगावलाही ऑक्सिजनची होणार निर्मिती

चाळीसगावलाही ऑक्सिजनची होणार निर्मिती

ठळक मुद्देअंबूजा कंपनीचा प्रकल्प : कोरोना काळात जपणार सामाजिक दायित्व

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या दरदिवशी वाढतेच असून ऑक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. परजिल्ह्यातून ऑक्सिजन येण्यास वेळही लागत आहे. अशा स्थितीत सामाजिक दायित्व म्हणून औद्योगिक वसाहतीतील गुजरात अंबूजा एक्सपोर्ट कंपनीतर्फे ट्रामा केअर सेंटर परिसरात युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनिष गुप्ता व संचालक संदीप अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. गुरुवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ट्रामा केअर सेटरची पाहणी करुन आढावाही घेतला.

गुजरात अंबूजा एक्सपोर्ट कंपनीने येथे औद्योगिक वसाहतीत २०१८पासून उत्पादन सुरु केले आहे. यापूर्वीही कंपनी व्यवस्थापनाने सामाजिक उपक्रम राबविले असून लोकसहभागातून उभारलेल्या कोरोना उपचार केंद्राला मदत, आवश्यक आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत.

सद्यस्थितीत कोरोनाची स्थिती सर्वदूर व्यापक झाली आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या आॅक्सिजनचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे उपचार घेणा-या रुग्णांच्या जीविताला धोका होऊ शकतो. कंपनी व्यवस्थापनाने ही आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती युनिट लवकरात लवकर उभारण्यासाठी काम सुरु केले आहे.

प्रतिमिनिट २१० लिटर ऑक्सिजनची निर्मिती

गुजरात अंबूजा कंपनीतर्फे ट्रामा केअर सेंटर परिसरात ५० ते ६० रुग्णांना पुरेल इतका प्रतिमिनिट २१० लिटर क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प येत्या काही दिवसात कार्यान्वित केला जाणार आहे. यासाठी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष ब्रीजमोहन चितलांगे, युनिट हेड वैभव पाटील हे प्रयत्नशील आहे. गुरुवारी कंपनीच्या प्रशासकीय विभागाने ट्रामा केअर सेंटर मधील जागेची पाहणीदेखील केली.

कोरोना उपचार केंद्राला मदत

महात्मा फुले आरोग्य संकुलात उभारलेल्या लोकसहभागातील कोरोना उपचार केंद्रासाठीही कंपनीने मदत केली आहे. बेड, मॕटरस, आयसीयू माॕनिटर, स्वनिर्मित ऑक्सिजन यंत्रे पुरवली आहे.

Web Title: Oxygen will also be produced in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.