कोरोनावर मात करीत एम.एस.ला प्रवेश- डॉ.निकिता मराठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 14:42 IST2020-07-12T14:40:17+5:302020-07-12T14:42:19+5:30
उपजिल्हा रुग्णालयात काम करीत असताना एकीकडे कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आणि दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी एम.एस.ला प्रवेश मिळाल्याचे पत्र अशाही परिस्थितीत ‘कोरोना’वर यशस्वी मात केली असल्याचे मुक्ताईनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निकिता मराठे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कोरोनावर मात करीत एम.एस.ला प्रवेश- डॉ.निकिता मराठे
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : उपजिल्हा रुग्णालयात काम करीत असताना एकीकडे कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आणि दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी एम.एस.ला प्रवेश मिळाल्याचे पत्र अशाही परिस्थितीत ‘कोरोना’वर यशस्वी मात केली असल्याचे मुक्ताईनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निकिता मराठे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : कोरोना नेमका कसा झाला?
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना दररोज बाह्यरुग्ण कक्षात ६० ते ७० रुग्णांची तपासणी करीत होते. सोबतच कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनच्या टप्प्यात सीमा तपासणी नाक्यावर वैद्यकीय तपासणी पथकात असतानना घरी परतणाऱ्या शेकडो श्रमिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या. रुग्ण सेवा बजावताना या दरम्यान कोरोना संक्रमण झाले.
प्रश्न : कोरोनावर मात कशी केली?
मूळातच वैद्यकीय शिक्षण झाल्याने व रुग्ण सेवेचा वसा घेतल्याने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्ण तपासणी दरम्यान आपणासही बाधा होऊ शकते याबाबत शक्यता होतीच. कोणतेही लक्षण नसताना कोविड तपासणी पॉझिटिव्ह आली. याची मुळीच भीती न बाळगता कोरोनावर मात करण्याचे माझे मनोबल होते. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने स्वत:च्या आरोग्याच्या काळजीबाबत सतर्कता होती. घरातही वातावरण वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने त्यांचे पाठबळ मिळाले. क्वारंटाईन काळात नियमित वर्कआउट पाठोपाठ औषधोपचार केला. विश्रांती आणि आहार याविषयी दक्षता बाळगली.
प्रश्न : एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना काय सल्ला देणार?
कोरोना संसर्गजन्य आजाराने जग हैराण आहे. बाह्य संपर्कातूून संसर्ग केव्हा कधी आणि कसा होईल याचा नेम नाही. म्हणून याची भीती न बाळगता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या कोविड रुग्ण सेवा नि:संकोचपणे स्वीकारावी. तसेच मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. क्वारंटाईन, कोविड सेंटर क्वारंटाईन आणि कोविड रुग्णालयातील उपचार याबाबत शासनाचे धोरण जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार आहे. लाखो रुग्णांच्या उपचारासाअंती निघालेल्या निष्कर्षाचा आधार याला आहे. त्यामुळे कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला याबाबत मनात भीती मुळीच नको. रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती जितकी महत्वाची आहे तितकेच महत्वाचे मनोबल आहे. सोबत शासकीय आरोग्य सेवेचा लाभ आवश्यक आहे. अधिकतर औषधोपचार लक्षणांवर आधारित असल्याने कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे आहे.
प्रश्न : उच्च शिक्षणासाठी पत्र मिळाले, तेव्हा मनात काय भावना होत्या?
पुणे येथील बी.जे.मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएस शिक्षण घेतानाच वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे निश्चय केला होता. यात एमडी मेडिसिन किंवा एम.एस. जनरल सर्जन या दोनपैकी एक विभागातून वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी केली होती. त्याला फळही मिळाले. औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात एम.एस. जनरल सर्जनला प्रवेश मिळाला. १५ जून हा दिवस कायम स्मरणात राहील. सकाळी ११ वाजता दरम्यान एकीकडे अहवाल पॉझिटिव आल्याचे कळले पण भीती वाटली नाही. तर काहीच वेळानंतर एम.एस.साठी प्रवेश मिळाल्याचे पत्र मिळाले. यामुळे उत्साह दुणावला आणि एकच विचार मनात होता की कोरोनामधून लवकर बाहेर पडून पुढील शिक्षणासाठी रवाना व्हायचं आहे.
प्रश्न : जीवनाचे ध्येय काय?
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून रुग्ण सेवा द्यायची. आजही समाजातील अनेक घटक वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने लहान मोठे आजार दुर्धर होत चालले आहे. वेळीच त्यांना उपचार मिळणे गरजेचे आहे अशा घटकांपर्यंत पोहचून आरोग्य सेवा देण्याचा मानस आहे.
प्रश्न : कौटुंबिक पार्श्वभूमी?
माझे वडील डॉ.एन.जी.मराठे हृदयरोगतज्ज्ञ आहेत. शेतकरी कुटुंबातील जिद्द व चिकाटीने त्यांनी एम.डी. मेडिसिन आणि एम.एस. (ई.एन.टी.सर्जन) अशा दोन वैद्यकीय शाखांमधून वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सामाजिक बांधिलकी म्हणून ते अनेक आॅफर नाकारत मुक्ताईनगरसारख्या ग्रामीण भागात ३० वर्षापासून वैद्यकीय सेवा देत आहे. आई सुनंदा मराठे गृहिणी असून, त्यांची आमच्या यशात तपश्चर्या आहे. मोठी बहीण गायत्रीदेखील एमबीबीएस झाली आहे. तीदेखील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्व परीक्षेची तयारी करीत आहे, तर लहान भाऊ अकरावीत असून, नीटची तयारी करीत आहे.