अठरा विसवे दारिद्र्यावर मात करीत आदिवासींनी साकारले ‘घर’कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:12+5:302021-07-02T04:12:12+5:30

'रो हाउस'ला लाजवेल अशी घरकुले जिल्ह्यात आदर्श ठरावे अशी कामगिरी नरेंद्र खंबायत अडावद, ता. चोपडा : रस्त्याच्या कडेला, ...

Overcoming the 18th poverty, the tribals formed a 'home' clan | अठरा विसवे दारिद्र्यावर मात करीत आदिवासींनी साकारले ‘घर’कुल

अठरा विसवे दारिद्र्यावर मात करीत आदिवासींनी साकारले ‘घर’कुल

'रो हाउस'ला लाजवेल अशी घरकुले

जिल्ह्यात आदर्श ठरावे अशी कामगिरी

नरेंद्र खंबायत

अडावद, ता. चोपडा : रस्त्याच्या कडेला, गावाबाहेर, माळरानावर, जंगलात मिळेल, त्या ठिकाणी झोपडी उभारून आपल्या जीवनाचा रहाटगाडा ओढत निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी-परंपरा यांच्यात गुरफटलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी घर, पक्के घर म्हणजे जणू स्वप्नच. परंतु हे स्वप्नच त्यांनी सत्यात उतरवलंय. होय, अठरा विसवे दारिद्र्यावर मात करीत उनपदेवच्या पायथ्याशी आदिवासीबांधवांनी 'घर’कुल साकारले आहे.

जिद्द, मेहनत, सचोटीच्या बळावर स्वप्नही साकार होतात, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय उनपदेव येथील आदिवासी बांधवांनी केलेल्या ‘घर’कुलांच्या कामाबद्दल आल्याशिवाय राहत नाही. अडावद गावापासून चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे. या परिसरात ठिकठिकाणी आदिवासी पावरा समाजबांधव वसलेला आहे. पिढ्यानपिढ्या या ठिकाणी आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे.

अडावद ग्रामपंचायतीच्या अंतर्गत या वाड्या, वस्त्या, पाडे असल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ मिळाला. आदिवासी बांधवांनी या संधीचे सोने करत अनुक्रमे उनपदेवलगत राहणाऱ्या राजाराम बारेला, सुताऱ्या बारेला, कृष्णा बारेला, वेडूराम बारेला यांनी शेतजमीन खरेदी केली. त्यास रहिवास प्रयोजनासाठी मान्यता मिळविली. तसेच उनपदेवच्या बाजूला असलेल्या रामजी पाडा येथील गुलाब बारेला, यासू बारेला, रामजी बारेला, रेला बारेला, बिहारी बारेला यांनीही मेहनत घेत शेतजमीन खरेदी करत रहिवास प्रयोजनासाठी प्रमाणित करून घेतली.

उनपदेव वस्तीचे राजाराम नगर (राजाराम वस्ती) तर दुसऱ्या पाड्याचे बिरसा नगर (रामजी पाडा) असे नामकरण करण्यात आले. राजाराम वस्तीत ७३६ स्क्वेअर फूटनुसार २२ जणांनी घरकुलाचे काम सुरू केले, तर बिरसानगरात ५० जणांनी ६३६ स्क्वेअर फूटनुसार आपले घरकुल बांधकाम सुरू केले. आदिवासी बांधवांनी ४ ते ५ गवंडी आणले. स्वतः गवंड्यासोबत समूहाने कामे केली. सामूहिकरीत्या सर्व मिळून खड्डे खोदणे, काॅलम भरणे, वीट बांधकाम करणे असे एकेकाचे बांधकामसारख्याच प्रमाणात उचलले. राजारामनगरात काही बांधकामे अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींची वाळूअभावी रखडली आहेत. बिरसानगरात मात्र बरीचशी कामे पूर्ण झाली असून, मोजकीच अंतिम टप्प्यात आहेत. येथेही वाळूअभावी कामे खोळंबली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना २०१९-२०२० अंतर्गत येथे ७६ घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यांना प्रत्येकी १ लाख ६८ हजार ५०० रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त होणार आहे. आदिवासी बांधवांनी सामूहिक साकारलेली ही घरकुले ‘रो-हाऊस’लाही लाजवतील अशी आहेत. वीज, पाणी, गवडींची टंचाई आदी समस्यांवर मात करीत आदिवासी बांधवांनी साकारलेली सामुदायिक ‘घरकुल योजना’ जिल्ह्यात एक आदर्श ठरावी.

प्रतिक्रिया

घरकुल योजना राबविण्यासाठी प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभले. गटविकास अधिकारी भरत कोसोदे, सरपंच भावना माळी, उपसरपंच भारती महाजन, प्रेमराज पवार आदींचे सहकार्य मिळाले.

-यासू बारेला, माजी सरपंच, अडावद

घरकुल योजना सुरू करण्यापासून ते आतापर्यंत गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांनी मेहनत घेतली असून दर आडवड्याला त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे. तसेच अडचणी, समस्या सोडविल्या आहेत.

-राजाराम बारेला, पाटील, उनपदेव वस्ती

010721\01jal_2_01072021_12.jpg

आदिवासींनी साकारले ‘घर’कुल

Web Title: Overcoming the 18th poverty, the tribals formed a 'home' clan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.