१३०० मतदार शंभरी पार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:54+5:302021-02-05T05:59:54+5:30
आकडेवारीवर जिल्हा प्रशासनालाच शंका, पुनर्तपासणीसाठी पाठवले लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम ...

१३०० मतदार शंभरी पार ?
आकडेवारीवर जिल्हा प्रशासनालाच शंका, पुनर्तपासणीसाठी पाठवले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम १५ जानेवारी
रोजी करण्यात आले. त्यात विधानसभानिहाय याद्या करण्यात आल्या आहेत.
त्यात जवळपास १३०० मतदार हे शंभर वर्षे वयापेक्षा जास्त होते. मात्र ही
आकडेवारी योग्य नसल्याने जिल्हा निवडणूक विभागाने याची माहिती
पडताळणी करण्यासाठी बीएलओंकडे पाठवली आहे. स्थानिक स्तरावरून ही माहिती
पडताळणी झाल्यानंतर त्याची आकडेवारी पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यात
येणार आहे.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम
नुकतेच संपले आहे. त्यानुसार मतदार याद्यांमध्ये ज्येष्ठ म्हणजे १००
वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांचा आकडा १ हजार ३०० पेक्षा जास्त
आहे. मात्र या आकडेवारीवर जिल्हा प्रशासनानेच शंका घेतली आणि त्याची
पडताळणी करण्यासाठी यादी बीएलओकडे पाठवण्यात आली आहे. त्यानुसार नंतर जी
माहिती समोर येईल ती माहिती मतदार यादीत दिली जाणार आहे.
जळगाव तालुक्यात २९० जण शंभरीपार
जळगाव तालुक्यात १५ सप्टेंबर अखेर आलेल्या यादीत २९० जण शंभरीपार होते.
मात्र या आकडेवारीची पडताळणी करण्यासाठी तालुका प्रशासनाने आपली यंत्रणा
कामाला लावली आहे. त्यानंतर ही आकडेवारी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
१५ जानेवारीनंतर देखील या आकडेवारीत सतत बदल होत असल्याची माहिती
प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
काय आहे नेमकी अडचण
एकाच जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ असले तरी १३०० पेक्षा जास्त मतदार
असू शकत नाही. सप्टेंबरमध्ये ही आकडेवारी समोर आली होती. त्यानंतर
त्याची माहिती अंतिम मतदार यादीतही आली आहे. मात्र त्यात अनेकांच्या
जन्मतारखा चुकलेल्या असणे, मृतांची नोंद नसणे किंवा काही जण
जिल्ह्याबाहेर गेले आहेत. त्यांची माहिती पत्त्यानुसार तपासणे गरजेचे
असते.
१५ हजार नवीन मतदारांची नोंदणी
गेल्या मतदार यादीपेक्षा आताच्या मतदार यादीत १५ हजार २९५ मतदारांचा
समावेश आहे. यात बहुतांश मतदार हे पहिल्यांदाच यादीत समावेश झालेले आहे.
असे असले तरी परजिल्ह्यातून जिल्ह्यात स्थायिक झालेल्यांचाही या यादीत
समावेश आहे. गेल्या मतदार यादीपेक्षा आताच्या मतदार संख्येत ही वाढ झाली
आहे.
जिल्ह्यातील मतदार ३४ लाख २८ हजार २६०
पुरुष मतदार - १७ लाख ८४ हजार ५५५
स्त्री मतदार - १६ लाख ४३ हजार ६१६