प्रत्येक प्रसंगावर निघतोय पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:21 IST2019-05-12T01:21:28+5:302019-05-12T01:21:49+5:30

जळगाव येथील साहित्यप्रेमी विशाखा देशमुख ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत पर्याय या शीर्षकांतर्गत ललित लेखात ‘मनमोकळं’ करताहेत...

Option to exit at every occasion | प्रत्येक प्रसंगावर निघतोय पर्याय

प्रत्येक प्रसंगावर निघतोय पर्याय

आयुष्य नेहमीच एक संधी देत असतं़ सोप्या शब्दात त्याला ‘आज’ म्हणतात़ आज काय होणार हे नियतीच सांगू शकते़ आॅफिसमध्ये लवकर पोहोचायचे असते अशा वेळी नेमकी किल्ली हरविणे किंवा गाडीतले पेट्रोल संपणे, रिक्षाने जावे तर रिक्षा लवकर न मिळणे, कधी अनावधानाने पैसे विसरणे, तर कधी मोबाइल चोरीला जाणे, महिलांना तर ऐन गडबडीच्या वेळी सिलिंडर संपल्याने होणारी धावपळ अशा अनेक प्रसंगांना आपण सामोरे जातच असतो़
पण काही वेळा तर असे प्रसंग उभे ठाकतात की पर्यायच सुचत नाही़ अशा वेळी योग्य निर्णय घेण्याचं भान असावं लागतं़ मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीओ आला होता़ एक सद्गृहस्थ निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यावरून जात होते़ एकटाच कारमध्ये असल्याने छान झोकात मोठ्या पुलावरून शीळ वाजवत गाडी चालवत होता़ अचानक ध्यानीमनी नसताना गाडी पंक्चर होत़े वरती तळपतं उन तर खाली वाहणारी नदी.
खाली उतरून टायर बदलण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्याने नटबोल्ट काढून जुने टायर काढले़ नवीन बदलणार तेवढ्यात हातातील नट खाली नदीत पडले़ ते अधिकच चिंताग्रस्त झाले़ पण कुठूनसा एक सामान्य माणूस येतो़ अशा वेळी परमेश्वर मदतीला येतो़ तसेच देवाच्या रूपात तो माणूस म्हणाला, ‘सर आता असं करा, बाकीच्या टायरचे १-१ नट काढून गाडी हळूहळू पुलावरून काढा़ थोड्या अंतरावर गॅरेज आहे़ तिथे गाडी चांगली करून घ्या़’ किती सहजतेने प्रश्न सुटला होता़ असाच काहीसा प्रसंग परवा घडला़ नुकताच गाण्याचा क्लास संपला होता़ राजश्रीने नेहमीप्रमाणे मला नमस्कार करून हातात सुंदरसा मोठ्या आकाराचा बॉक्स दिला आणि म्हणाली, ‘मॅडम, काल तुमचा वाढदिवस झाला म्हणून ही छोटी भेट. आताच बघा आणि सांगा आवडले का?’ त्यात असणारी साडी छानच होती़ पण तिच्याकडून घेणे योग्य वाटत नव्हते़ तिला सांगितलं़, ‘घेईन. पण तुझ्या लग्नात किंवा तुझ्या घरी येईन तेव्हा.’ ‘पण मॅडम घ्यानं़ माझ्या कमाईतून तुम्हाला आणि आईला घेतली आहे.’ अशाप्रसंगी कसं रिअ‍ॅक्ट व्हावं तेच कळत नव्हत़ं तिने इतक्या प्रेमाने दिली होती की, नकार देणंही चांगलं वाटत नव्हतं. काहीच पर्याय दिसत नव्हता़ तिला कोणत्या तरी प्रसंगी आपण ड्रेस घेऊन देऊ म्हणून मी ती ठेवून घेतली़ असे प्रसंग नेहमी घडत असतात. त्यातून काहीतरी पर्याय हा निघतच असतो.
-विशाखा विलास देशमुख, जळगाव

Web Title: Option to exit at every occasion