स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीवरून सुरू झाला शब्दांचा खेळ : शिवसेनेतच निर्माण होऊ शकतो पेच
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवड पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून, सभापतिपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच सत्तातरांच्या वेळेस सभापतिपद हे सुनील खडके यांना देण्यात यावे अशी अट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बंडखोरांसह शिवसेनेच्या नेत्यांसमोर ठेवली होती. त्यावेळेस शिवसेनेने देखील या नावासाठी हमी दर्शविली होती. मात्र, आता सभापतिपदावरून शिवसेनेसह बंडखोरांमध्येही इच्छुक वाढल्याने खडसेंनी खडकेंसाठी दिलेला शब्द शिवसेना टाळण्याचा स्थितीत असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली आहे.
यामुळे स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत बंडखोर नगरसेवक विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना अशी देखील लढत होण्याची शक्यता आहे. कारण सुनील खडके यांना सभापतिपदासाठी शब्द दिल्याचे सांगितले जात असले, तरी काही बंडखोर नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार तेव्हा खडसे यांना कोणताही शब्द देण्यात आला नसल्याचे सांगितले. तसेच यासाठी बंडखोर नगरसेवकांपैकी एकाला संधी दिली जाईल. मात्र, त्यात सुनील खडके हे राहणार नाहीत अशी माहिती बंडखोर नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाने दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
१. मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीदरम्यान उपमहापौर पद हे सुनील खडके यांना देण्यात यावे, अशी अट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ठेवली होती. मात्र, या अटीवर काही नगरसेवक नाराज झाले होते.
२. त्यात खडके यांच्या पाठीशी काही ठरावीक नगरसेवकच असल्याने त्यांना उपमहापौरपद दिले गेले तर नगरसेवकांचे बंड फोल ठरून, भाजपचाच महापौर व उपमहापौर होईल अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपद देण्यात आले.
३. सुनील खडके यांना स्थायी समिती सभापतिपद देण्यात यावे अशी अट खडसे यांनी ठेवली. तेव्हा काही नेत्यांनी होकार दिला असला, तरी काही नेत्यांनी खडके यांच्या नावाला तेव्हाही विरोधच केला होता.
४. आता पुढील महिन्यात सभापतिपदासाठी निवडणूक होणार असतानाच खडसेंनी दिलेले खडकेंचे नाव पुन्हा पुढे आले आहे. मात्र, हे नाव पुढे येताच बंडखोर नगरसेवकांसह शिवसेनेत देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
बंडखोर बाविस्करांच्या नावासाठी आग्रही
भाजपमधून फुटून शिवसेनेत गेलेले बंडखोर नगरसेवक सभापतिपदासाठी किशोर बाविस्कर यांच्या नावासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे सुनील खडके यांचे नावही पुढे आहे. त्यातच सभापतिपद हे शिवसेनेत आधीपासून असलेल्या १५ नगरसेवकांपैकी एकाला देण्याबाबत देखील शिवसेनेचे काही नेते आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेनेतच सभापतिपदाच्या नावावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिलेल्या शब्दाबाबत बोलायला कोणी तयार नाही ?
खडसेंनी खडकेंसाठी शब्द घेतला होता की नाही? याबाबत शिवसेनेचे नगरसेवक व बंडखोर नगरसेवकदेखील ठामपणे बोलायला तयार नाहीत. काही नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे खडकेंच्या उपमहापौरपदासाठी आग्रही होते असे सांगितले, तर सभापतिपदासाठी कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगतात. काही नगरसेवकांनी मात्र याबाबत शब्द दिला असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत बोलायलादेखील नकार दिला आहे.