आयुक्त बदलासाठी मनपा विरोधी पक्षनेते घालणार नगरविकास मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:13+5:302021-04-07T04:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली असून, राज्य शासनाच्या मदतीने शहरातील कामे मार्गी लावण्यावर भर दिला ...

आयुक्त बदलासाठी मनपा विरोधी पक्षनेते घालणार नगरविकास मंत्र्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली असून, राज्य शासनाच्या मदतीने शहरातील कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, शहरातील अनेक महत्वाच्या कामांसाठीच्या फाईली या मनपा आयुक्तांकडे पडून असून, या कामांबाबत आयुक्त उदासीन आहेत. यामुळे आयुक्तांची बदली करण्यात यावी अशी मागणी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केली असून, याबाबत बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे ही मागणी केली जाणार असल्याची माहिती सुनील महाजन यांनी ‘लोकमत’ ला दिली.
मनपात सत्तांतर झाले असले तरी आता मनपातील सत्ताधारी व मनपा प्रशासन असा वाद रंगण्याची शक्यता आहे. महापौरांचे पती व मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली असून, शहरातील अनेक महत्वांच्या कामांना ब्रेक लावण्याचे काम आयुक्तांकडे केले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. याबाबत मध्यंतरी महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे देखील आयुक्तांच्या कामकाजाबाबत तक्रार देखील केली होती.
सेवानिवृत्तीचा काळ जवळ येत असल्याने वेळकाढूपणा
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ येत असल्याने आयुक्तांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. मनपात सत्तांतर झाल्यानंतर नगरविकास मंत्र्यांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली होती. मनपात शिवसेनेची सत्ता ही भाजपने अडीच वर्षात कामे न केल्याने आली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या शिवसेनेकडून अपेक्षा आहेत. मात्र, आयुक्तांची कार्यपध्दती ही शहराच्या कामांच्या आड येत आहे. यामुळे त्यांची बदली करून नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आयुक्तांकडून ‘नो कमेंट’
मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या आरोपाबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना विचारले असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास आपण उत्सुक नसल्याचे त्यांनी सांगितले.