शाळा व महाविद्यालयांची दारे उघडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST2021-09-22T04:19:47+5:302021-09-22T04:19:47+5:30

धरणगाव - ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे; मात्र शहरातील प्राथमिक ...

Open the doors of schools and colleges! | शाळा व महाविद्यालयांची दारे उघडा!

शाळा व महाविद्यालयांची दारे उघडा!

धरणगाव - ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे; मात्र शहरातील प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आणि महाविद्यालय अजूनही बंद आहेत. हे वर्ग सुरू करावेत, यासाठी धरणगाव तालुक्यातील शिक्षक संघटनांनी मंगळवार, २१ रोजी तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी, पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

कोविड आपत्तीमुळे गेल्या अठरा महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोविडची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली दिसते. शिवाय शासनाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भागात शाळा सुरू झालेल्या आहेत; मात्र धरणगाव शहरातील ५ माध्यमिक, १ उर्दू माध्यम, ६ खासगी प्राथमिक शाळा बंद आहेत. शहरातील या शाळा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी पालकदेखील करीत आहेत.

ग्रामीण भागात शाळा सुरू असल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत पालक चिंतेत आहेत. ऑनलाइन शिक्षणाचे फारसे समाधानकारक परिणाम दिसून येत नाही. धरणगाव शहरात शिक्षणासाठी येणारे बरेच विद्यार्थी तालुक्यातील खेड्यांवरून येत असतात. ग्रामीण भागात शाळा सुरू असल्यामुळे शहरात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या सर्व घटकांना आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असेच वाटत आहे. त्यासाठी शासनाने तातडीने शाळा सुरू करणेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे, नगरपालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. एस. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. के. पाटील, टीडीएफचे अध्यक्ष डी. एस. पाटील, उपाध्यक्ष पी. डी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष एस. झेड. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी तेजेंद्र चंदेल,

पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे , ॲग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शकील शेख, बालकवी विद्यालयाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, इंदिरा गांधी विद्यालयाचे एन. बी. पाटील, डी. एन. पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. सोनवणे, महात्मा फुले हायस्कूलचे पर्यवेक्षक एस. व्ही. आढावे, जुक्टोचे विभागीय प्रतिनिधी प्रा. डी. डी. पाटील, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. रेखा बिरारी, कोळी, ग.स. चे माजी संचालक जीवन पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो २२ एचएसके ०२

शाळा सुरू करण्याबाबत नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांना निवेदन देताना सी. के. पाटील, एस. एस. पाटील, डी. एस. पाटील, रेखा बिरारी, डॉ. संजीव कुमार सोनवणे आदी.

(छाया कल्पेश महाजन)

Web Title: Open the doors of schools and colleges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.