लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ११ आगारांपैकी फक्त चार आगारांमध्येच ५० टक्केपेक्षा जास्त अँटी मायक्रोबियल कोटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यात जळगाव, अमळनेर, एरंडोल आणि जामनेर येथे काम झाले आहे. तर पाचोरा येथे शुक्रवारी कामाला सुरुवात करण्यात आली होती. इतर सर्व आगारातील एकही बसला कोरोना फ्री करण्यात आलेले नाही. असे असले तरी प्रवासी मात्र बेफिकिरीनेच प्रवास करताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक बसेस या जळगाव आगारात आहेत. त्यात ११८ पैकी ७६ बसेसचे अँटी मायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. तर भुसावळ आणि चाळीसगाव या दोन मोठ्या आगारांचे देखील कोटिंग अद्याप करण्यात आलेले नाहीत.
किती बसेसना कोटिंग ?
जळगाव ११८ ७६
अमळनेर ७१ ४२
एरंडोल ५४ २२
जामनेर ७८ २१
पाचोरा ५६ काम सुरू
चाळीसगाव ७६ ०
यावल ६० ०
चोपडा ७६ ०
मुक्ताईनगर ४७ ०
रावेर ५६ ०
भुसावळ ४५ ०
एका एसटीला वर्षातून चार वेळा होणार कोटिंग
एका एसटीला कोटिंग केल्यावर त्याचा परिणाम हा साधारणत: दोन ते तीन महिने राहतो. या कोटिंगवर कोणताही विषाणू तग धरू शकत नाही. त्यामुळे बाधित व्यक्ती सिटवर बसली तरी ती उठून गेल्यावर तेथे विषाणू राहू शकणार नाही.
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूला बसला असल्यास?
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही. मात्र बाजूला बसलेला असल्यास त्यातून संसर्गाची शक्यता बळावते. त्यामुळे प्रवाशांनी मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. जळगाव आगारातून सुटणाऱ्या अनेक बसेसमध्ये प्रवासी मास्क न लावताच बसलेले होते.
प्रवासी काय म्हणतात...
कोटिंग केल्याचा परिणाम नेमका काय होणार, जर बाधित व्यक्ती बाजूला बसली असेल तर त्यातून संसर्ग होऊ शकतो. मात्र आता कुणीच त्याचा जास्त विचार करत नाही. आम्हाला प्रवास करायला मिळतो, हेच खूप आहे. - दामोदर पाटील
अशी कोटिंग केल्याने जर कोरोना जाणार असेल तर सर्व बसेसला कोटिंग करावी. त्यामुळे प्रवास आणखी सुरक्षित होईल. ५० टक्के बसेसलाच का, सर्व बसेसला कोटिंग करायला हवे. त्यामुळे प्रवाशांना फायदाच होईल - रामचंद्र भोई.