बोदवड शहरात वर्षभरात केवळ १८ दिवस पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 17:59 IST2017-11-24T17:54:29+5:302017-11-24T17:59:26+5:30
बोदवड येथे ओडीए योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर पाणी पुरवठा समस्या झाली गंभीर

बोदवड शहरात वर्षभरात केवळ १८ दिवस पाणी पुरवठा
गोपाल व्यास/ आॅनलाईन लोकमत
बोदवड,दि.२४ : बोदवड ग्रा.पं.ची नगरपंचायत झालेल्या बोदवड शहराला वर्षभरात केवळ १८ दिवसच पाणी मिळाल्याची विदारक स्थिती आहे. ओडीए पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर येथील पाणी समस्या बिकट झाली आहे.
गावाचा तालुका झालेले हे शहर मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. ग्रामपंचायतीच्या कालावधीत शहरवासीयांना महिन्यातून किमान तीन दिवस तरी पाणी मिळत होते. शिवाय घर आणि पाणीपट्टी कमी होती आणि सक्तीची वसुलीदेखील होत नव्हती.
६ मे २०१६ मध्ये बोदवड ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि नगरपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर शहरवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. आता विकास होणार. वेळेवर मुलभूत सुविधांसह पाणी मिळणार या आशेने शहरवासीय आनंदीत होते. परंतु त्यांच्या आशेवर वर्षभरात पाणी फिरले. नगरपंचायतीने सक्त वसुली हाती घेतली. थकबाकीदारांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले. शहरात मोठे फलक लावून थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. बदनामीपोटी काहींनी तत्काळ पाणी व घरपट्टी भरली. त्या मोबदल्यात नगरपंचायतीने काय दिले? पंधरा दिवस ते २० दिवसाआड पाणी वर्षभरात केवळ १८ दिवस पूर्ण वर्षात फक्त ३६ तास पाणी तेही रात्रीबेरात्री अशी स्थिती बोदवड शहराची झाली आहे.
गत महिन्यातच पाणीपुरवठा सभापतींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे क्लोरीनसाठी मीठ उपलब्ध करून देण्यासाठी लेखी पत्र ही पाठवले होते. परंतु काहीही हालचाल झाली नसल्याची स्थिती आहे. यामुळे जुन्या जिर्ण पाईपलाईनमधून जंतुमय पाणीपुरवठा होत आहे.