ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:43+5:302021-03-23T04:16:43+5:30
कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ !
कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला : ऑनलाईन शिक्षणापासून लाखांवर विद्यार्थी वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धत रूजली. परंतु, ग्रामीण भागात आजही अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत तर काहींकडे तेही नाहीत. ज्यांच्याकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला बघायला मिळत आहे. परिणामी, अजूनही जळगाव जिल्ह्यातील लाखांच्यावर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.
कोरोना विषाणूचा मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गतवर्षी मार्च महिन्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली आहे. परंतु, याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे चित्र काही दिवसातच समोर आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ही मुलं वाड्या-वस्त्यावर राहात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. या विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घरापर्यंत शिक्षण पोहोचवले. गुरूजींनी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. सोबत आकाशवाणीद्वारे शिक्षण दिले.
ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाल्यापासून पहिली ते दहावीचे शिक्षक व संबंधित संस्था त्या संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुलांसाठी अभ्यासक्रम टाकतात. हा अभ्यास शहरातील ठराविक मुलेच करतात व केलेला अभ्यास व्हॉट्सअॅपवर टाकतात. दरम्यान, नुकत्याच शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे पुन्हा बंद पडल्या अन् ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. पण, हवे तसे ऑनलाईन शिक्षण अजूनही विद्यार्थ्यांना मिळत नाही. जिल्हा परिषद, मनपा शाळेतील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत.
परीक्षा मात्र सुरळीत
काही किरकोळ अडचणी वगळता ऑनलाईन परीक्षाही प्रभावी ठरली. शाळा, महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या. सुरूवातीला लॉग-इन होत नसल्याची तांत्रिक अडचण उद्भवली. नंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या. मात्र, प्रत्यक्ष शाळा व परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.