वेतननिश्चिती फरकाचे एक लाख रुपये परस्पर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:59 IST2018-04-04T16:59:25+5:302018-04-04T16:59:25+5:30
चाळीसगाव बाजार समिती : सचिवाचा पदभार काढला

वेतननिश्चिती फरकाचे एक लाख रुपये परस्पर काढले
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.४ : चाळीसगाव बाजार समितीचे सचिव जगदीश रघुनाथ लोधे यांनी त्यांच्या वेतन निश्चितीच्या फरकाचे एक लाख सहा हजार १६८ रुपये परस्पर काढल्याने संचालक मंडळाने बुधवारी त्यांचा पदभार काढला आहे.
लोधे यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या वेतन निश्चितीचा फरक संचालक मंडळाची मान्यता न घेताच काढला. फरक काढणेबाबत ठराव करणे आवश्यक असतांना त्यांनी प्रस्ताव सादर करुन बिल काढल्याचा ठपका संचालक मंडळाने ठेवला आहे. याबरोबरच लोधे हे आपल्या पदाला न्याय देऊ शकत नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. फरकाचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेऊन मान्यता घेणे गरजेचे होते. मात्र त्याचे उल्लंघन झाले असल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. लोधे यांच्याकडील सचिवपदाचा पदभार काढून तो सहसचिव ए.ए.पाटील यांच्याकडे सोपविला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.
वेतन निश्चितीचा फरक काढण्याचा मला अधिकार आहे. माझ्याच वेतनातील तो फरक आहे. प्रस्ताव रितसरच दाखल केला आहे. यात चुकीचे काहीही नाही.
- जगदीश लोधे, सचिव
बाजार समिती, चाळीसगाव
सचिव जगदीश लोधे यांच्या कामकाजात अनियमतता मोठ्या प्रमाणावर आहे. २८ मार्चच्या मासिक सभेतच त्यांचा पदभार काढला असल्याचा ठराव केला आहे. फरकाची रक्कम संचालक मंडळाला विश्वासात घेऊन काढली गेली नाही.
- रवींद्र चुडामण पाटील
सभापती, बाजार समिती, चाळीसगाव