दीड वर्षाच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:38+5:302021-05-07T04:16:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका दीड वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला ...

A one and a half year old child was bitten by a dog | दीड वर्षाच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके

दीड वर्षाच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका दीड वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून संबंधित बालकाला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत असून, गुरुवारी देखील दीड वर्षाच्या मुलाला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संबंधित बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. यामुळे या बालकाचा जीव वाचला. जखमी बालकाला जिल्हा शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

उस्मानिया पार्क परिसरात शाहरुख खान हा दीड वर्षाचा बालक सकाळी दहा वाजता अंगणात खेळत होता. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने या बालकावर हल्ला केला. या बालकाच्या मानेवर कुत्र्याने चावा घेतला असून, यामुळे हा बालक गंभीर जखमी झाला. तसेच कुत्र्याने या बालकाला ओढण्याचा प्रयत्न देखील केला. हा प्रकार संबंधित बालकाची आई नाजमीबी यांच्या लक्षात आल्यानंतर या महिलेने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. नागरिकांनी बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले व तत्काळ खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या गेल्या दोन वर्षांपासून बिकट होत आहे. याबाबत मनपा प्रशासनाविरोधात नगरसेवकांसह अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर देखील मनपा प्रशासनाला मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर नियोजन करता आलेले नाही. शहरात कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांना रस्त्यावरही फिरणे आता कठीण होत आहे.

वर्षभरात ४७० जणांना घेतला चावा

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या आता १९ हजार पेक्षा जास्त झाली आहे. तसेच दररोज मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक नागरिक देखील जखमी होत आहेत. गेल्या वर्षभरात शहरातील ४७० जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका नऊ महिन्याच्या मुलाचा मृत्यू देखील झाला होता. तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच एका शेतकऱ्याच्या तोंडाचा जबडा देखील मोकाट कुत्र्यांनी तोडला होता. मनपा स्थायी समितीच्या सभेत व महासभेत देखील मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत अनेक वेळा गोंधळ देखील झाले. मात्र तरी मनपा प्रशासनाला या समस्येवर कोणताही तोडगा काढता आलेला नाही.

मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरणाची निविदा देखील रखडली

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची तयारी सुरू केली होती. गेल्या वर्षी देखील महापालिकेने अमरावती येथील एका संस्थेला शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्बिजीकरण करण्याच्या ठेका दिला होता. मात्र प्राणी मित्रांच्या तक्रारीनंतर केंद्र शासनाच्या ॲनिमल वेल्फेअर या संघटनेने हे काम थांबवले होते. वर्षभरापासून हे काम थांबले असून, संबंधित संस्थेला दिलेला ठेका देखील रद्द करण्यात आला आहे. महापालिकेने नवीन संस्थेला हा ठेका देण्यासाठी अनेक वेळा निविदा काढून देखील निविदा प्राप्त झाल्या नव्हत्या, निविदा प्राप्त न झाल्याने मनपाने आता नवीन निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान महापालिकेच्या अटी शर्ती मध्ये अनेक निविदा धारक पात्र ठरत नसल्याने महापालिका प्रशासनाने आपल्या अटी शर्ती मध्ये बदल करण्याची गरज असल्याचेही अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे. अटी-शर्ती मध्ये बदल केल्यास राज्यभरातील अनेक संस्था हे काम करण्यासाठी पुढे येतील असा दावाही नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: A one and a half year old child was bitten by a dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.