प्राध्यापिकेच्या बनावट अकाऊंटवरुन अश्लिल फोटो व्हायरल, सायबर पोलिसात गुन्हा
By सुनील पाटील | Updated: September 25, 2022 14:44 IST2022-09-25T14:43:49+5:302022-09-25T14:44:13+5:30
सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या साईटवर महिला प्राध्यापिकेचा फोटो वापरुन त्यांच्या नावाने बनावट खाते तयार करण्यात आले.

प्राध्यापिकेच्या बनावट अकाऊंटवरुन अश्लिल फोटो व्हायरल, सायबर पोलिसात गुन्हा
जळगाव :
सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या साईटवर महिला प्राध्यापिकेचा फोटो वापरुन त्यांच्या नावाने बनावट खाते तयार करण्यात आले. त्यानंतर याच खात्यावरुन अश्लिल फोटो व्हायरल करण्यासह स्टेटस्ला हे फोटो ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या या २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या नावाने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या साईटवर बनावट खाते तयार केले. त्यात या प्राध्यापिकेचा फोटो वापरण्यात आलेला आहे. महिला व पुरुषांचे अश्लिल फोटो स्टेटस्ला ठेऊन प्राध्यापिकेच्या संपर्कातील ओळखीच्या लोकांनाही हे फोटो पाठविण्यात आले. काही जणांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठविण्यात आलेली आहे. प्राध्यापिकेची बदनामी व्हावी याच उद्देशाने हा प्रकार झाल्याचे उघड झालेले आहे. १० ते २४ सप्टेबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर प्राध्यापिकेला धक्काच बसला. त्यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.