मुक्ताईनगर : येथील गोदावरी नगरातील अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण माहअंतर्गत पौष्टिक पाककृती स्पर्धा घेण्यात आली. मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा साळुंके व नगरसेवक नीलेश शिरसाट यांनी माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले.
महिलांना पोषणाबद्दल माहिती व्हावी, यासाठी प्रा.डॉ.प्रतिभा ढाके यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी गर्भवती महिलेचा आहार, स्तनपान करणाऱ्या मातेचा आहार, किशोरवयीन मुलींचा आहार या वेगवेगळ्या रूपांत महिलांचे आहारातील कोणत्या घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, ते सांगितले. पोषण व मानसिक स्वास्थ्य यांचा परस्पर संबंध कसा आहे, पौष्टिक आहाराविषयी महिलांना ज्ञान असेल, तर कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास कशी मदत होते, याची जाणीव त्यांनी व्याख्यानातून करून दिली.
महिलांनी केलेल्या पाककृती, तयार केलेले संदेश अतिशय कलात्मकरीत्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनास मान्यवरांनी भेटी दिल्या.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडीसेविका मनीषा चौधरी, भारती पाटील, सुवर्णा पाटील, वैशाली घुले यांनी परिश्रम घेतले.