मे महिन्यात २० पटीने वाढले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:44 IST2020-06-08T10:44:15+5:302020-06-08T10:44:31+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विस्फोट : जून महिन्याच्या सहा दिवसातच २७२ रुग्णांची भर

मे महिन्यात २० पटीने वाढले रुग्ण
आनंद सुरवाडे ।
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे़ मार्च एप्रिलमध्ये दिलासा होता़ मात्र, मे महिन्यात या कोरोना संसर्गाचा अक्षरश: विस्फोट झाला.
मार्च, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात तब्बल वीस पटीने रुग्णांची संख्या वाढली़ हा महिना जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक ठरला आहे़ एप्रिल अखेरपर्यंत ३७ वर असलेली रुग्णसंख्या मे महिन्यात ७४८ झाली होती़ त्यामुळे चिंता वाढली आहे. यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
उपचार सुरू असलेले ४२९ रुग्ण
जिल्हाभरात रुग्णसंख्या वाढली तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे़ एकूण रुग्णांपैकी ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्यस्थितीत ४२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मूळ रुग्णांची संख्या ही ४२९ आहेत़ दरम्यान, ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ बरे होणाºया रुग्णांमध्ये जळगाव शहरातील सर्वाधिक १२८ तर भुसावळ ११३ व अमळनेर येथील १०० रुग्णांचा समावेश आहे़
साडेचार लाख जनता कंटेमेंट झोनमध्ये
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचे परिणाम जिल्ह्यातील सामान्यांच्या जीवनावर पडू लागले आहे़ रुग्णसंख्या वेगवेगळया भागात आढळत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही कमालीची वाढली आहे़ यात जळगाव शहरात ५८ प्रतिबंधित क्षेत्र आखण्यात आले आहेत तर जिल्हाभरात असे २५० क्षेत्र झालेले आहेत़ यात जिल्हाभरातील एकूण ४ लाख ७९ हजार ८४१ इतके लोक या प्रतिबंधित क्षेत्रात अडकून आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा वाढल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये ६० प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे़
मे महिन्यातील कडक उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असा दावा करण्यात येत होता़ जिल्ह्यातील मे हिट सर्वत्र परिचित आहे़ यंदाही तापमानात जळगाव अनेक वेळा राज्यात अव्वल राहिले़ मात्र, या तापमानाचा कोरोनाच्या संसर्गावर कुठलाही परिणाम न जाणवता उलट याच महिन्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाला़ तब्बल ७१० नवीन रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तपासणीची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे.
यात अनेकांनी लॉकडाऊनमधील शिथिलता, नियमांचे पालन न होणे या बाबी या संसर्गाला कारणीभूत असल्याचेही म्हटले होते़ परंतु आता संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.