सचिन देव
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शासनाने धार्मिक स्थळे वगळता १५ ऑगस्टपासून सर्वत्र अनलॉक केले आहे. यामुळे सर्व व्यापार-उद्योग पूर्वपदावर आले आहे. लग्न समारंभानांही १०० जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक नागरिक पुढील महिन्यात लग्न समारंभासाठी मंगल कार्यालय व बॅण्ड बुकिंग करत आहेत. त्यामुळे विवाह इच्छुकही ‘शुभमंगल सावधान’करण्यासाठी तयारीत आहेत.
१५ ऑगस्टपासून विवाह सोहळ्यांना १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांमधून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. मंगल कार्यालये, लॉन व हॉटेलमध्ये किमान १०० जणांच्या उपस्थित लग्न समारंभ करण्याच्या सूचना असताना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
लग्न समारंभासाठी या आहेत अटी
- मंगल कार्यालय व लॉन
मंगल कार्यालय धारकांनी विवाह सोहळ्यात १०० जणांची उपस्थिती राहील, याची काळजी घ्यावी तसेच कोरोनासंबंधी निर्जंतुकीकरण व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- नियमांचे पालन होत असल्याबाबत मंगल कार्यालयधारकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवणे किंवा सक्षम अधिकाऱ्याला बोलावून तपासणी करून घेणे.
-भोजन व्यवस्थापन, बँड पथक, फोटोग्राफर्स यांच्या लसीकरणाची खात्री करावी.
इन्फो
मंगल कार्यालयांची बुकिंग वेगाने सुरू
शासनाने लग्न समारंभांना १०० जणांची परवानगी दिल्याने, अनेक नागरिक आता मंगल कार्यालयांमध्ये लग्न करण्यासाठी आतापासूनच बुकिंग करत आहेत. आमच्याकडे पुढील महिन्यातील काही तारखा व दिवाळीनंतरच्या तारखांचे बुकिंग वेगाने सुरू आहे.
लतिश बारी, मंगल कार्यालय व्यावसायिक
लग्न ठरलेल्या कुटुंबातर्फे पुढील महिन्यातील तारखा बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे तसेच दिवाळीनंतरच्याही तारखा बुकिंग करण्यासाठी नागरिकांकडून चौकशी सुरू आहे. विवाहसोहळे मंगल कार्यालय व लॉनमध्ये करण्याचे नियोजन सुरू आहे.
यश मंत्री, लॉन व्यावसायिक
इन्फो :
लग्नाच्या तारखा
ऑगस्ट : १८,२०, २१, २५,२६,२७,३०,३१
सप्टेंबर : १, ८, १६, १७
ऑक्टोबर : ८, १०, ११, १३, १४, १५, १८, १८, २०, २१, २४, ३०
नोव्हेंबर :८, ९, १०, १२, १६, २०, २१, २९, ३०
डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९
पंडिताची प्रतिक्रिया
अनेक जण लग्नाच्या तारखा काढण्यासाठी येत आहेत. नागरिकांना कोरोनामुळे थांबलेले विवाह आता उत्साहाने साजरे करता येणार आहेत. अनेकांकडून दिवाळीनंतरही लग्न तिथी मुहूर्त निवडले जात आहेत.
नंदू शुक्ल गुरुजी.
कोरोनाकाळात मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्न होत असल्यामुळे, बॅण्ड व्यवसाय बंदच होता. आता शासनाने १०० जणांची परवानगी दिल्यामुळे, नागरिक बॅण्डच्या बुकिंगला येत आहेत. दोन तारखा बुकिंग झाल्या आहेत.
प्रमोद नारखेडे, बॅण्ड व्यावसायिक
कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदाही लग्न समारंभांना बंदी असल्यामुळे, बॅण्डचा व्यवसाय बंदच होता. आता मुला-मुलींचे लग्न ठरलेल्या पालकांकडून बॅण्डबाबत चौकशी सुरू आहे. हळूहळू तारखा बुकिंग व्हायला सुरुवात होईल.
संदीप गुरव, बॅण्ड व्यावसायिक