आता शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती मागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:16+5:302021-02-05T06:00:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या फ्रंटलाईन वर्करनंतर आता जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस ...

आता शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती मागविली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या फ्रंटलाईन वर्करनंतर आता जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी त्यांची माहिती मागविण्यात आली आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी संबधित यंत्रणेला पत्र दिले आहे. ही कर्मचारी संख्या २० हजारांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून खासगी आणि शासकीय अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक टप्प्यात लस देण्याचे नियोजन होते. यात २० कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली होती. मात्र त्यात आतापर्यंत ६६१९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. ही संख्या अद्याप ५० टक्क्यांपर्यंतही पोहचली नसल्याचे चित्र आहे. सोमवारी तेरा केंद्रांवर १०६४ जणांनी लस घेतली. नेहमीपेक्षा ही संख्या वाढलेली होती. यात जीएमसीत दोघांना रिॲक्शन आले होते. दरम्यान, शासनाचे पत्र प्राप्त झाले असून जिल्हा परिषदेच्या फ्रंटवरील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच लोकप्रतिनिधींची माहितीही प्रशासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
तांत्रिक अडचणी
महसूल व पोलीस प्रशासनाची माहिती ॲपवर अपलोड करण्यात आली आहे. मात्र, शंभर जणांना एसएमएस पाठविताना ही यंत्रणा लॉक असल्याने एसएमएस पाठविण्यास तांत्रिक अडचणी आल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लसीकरण थांबले होते. सोमवारी दिवसभर ही यंत्रणा अनलॉक झाली का याची अधिकारी व कर्मचारी वाट बघत होते.
उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण
दररोज शंभर कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मात्र, महापालिकेचे केंद्र असलेल्या दोन खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून शंभरापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे. सोमवारी गाजरे रुग्णालयात १०६ तर गोल्डसिटी रुग्णालयात १०८ जणांना लस देण्यात आली.