बाह्यरुग्णांना रेमडेसिवीर दिल्याने चार डॉक्टरांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:04 IST2021-04-11T00:03:41+5:302021-04-11T00:04:43+5:30
एरंडोल, भुसावळ, पहूर व कजगाव येथील चार डॉक्टरांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नाेटीस बजावली आहे.

बाह्यरुग्णांना रेमडेसिवीर दिल्याने चार डॉक्टरांना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अधिकारात बसत नसतानाही बाह्य रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याने एरंडोल, भुसावळ, पहूर व कजगाव येथील चार डॉक्टरांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नाेटीस बजावली आहे.
यात एरंडोल येथील शहा हॉस्पिटलचे डॉ. जाहीद शहा, भुसावळ येथील मुस्कान हॉस्पिटलचे डॉ. तौसिफ खान व कजगाव ता. भडगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. निखील बोरो आणि पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. सचिन भडांगे पहूर यांचा समावेश आहे.
दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कोविडची मान्यता रद्द करण्याचा इशारा या डॉक्टरांना देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यक त्या रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नसल्याची परिस्थिती असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काही निकष घालून दिले आहेत. दरम्यान, यानुसार इंजेक्शन देण्र्याचे अधिकार हे फिजिशियनयांना असल्याचे नमूद करण्यात आले आहे.