विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बॉम्बस्फोट प्रकरणात माझ्या निर्दोष मुलाला अडकविल्याने त्याच्या आयुष्यातील उमेदीचा काळ तुरुंगात गेला. त्याच्या या शिक्षेच्या काळात कुटुंबाने किती यातना, सामाजिक त्रास सहन केला हे सांगता येणार नाही. १९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. निर्दोष मुक्त केलेल्यांमध्ये जळगावातील आसिफ बशीर खान (५२, रा. शिरसोली नाका, तांबापुरा) यांचाही समावेश आहे. हा निकाल आल्यानंतर त्यांच्या घरी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी घरातील सर्वच सदस्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत.
पदोपदी जाणवली पितृछत्राची उणीवअभियंता असलेले आसिफ खान कंपनीच्या कामानिमित्त बेळगाव येथे गेले होते. २० ऑक्टोबर २००६ रोजी त्यांना तेथून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली आणि एक मुलगा लहान होते. आज एका मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर मुलगा अभियंता झाला आहे. बालपण, शिक्षणाचा काळ आणि त्यानंतर घरातही प्रत्येक वेळी वडिलांची उणीव जाणवली, अशी भावना आसिफच्या मुलींनी व्यक्त केली.
तीन प्रकरणांत आसिफ खान निर्दोष२००१मध्ये आसिफ खानविरुद्ध सीमी संघटनेसंदर्भात जळगावात दाखल गुन्ह्यात ते यापूर्वीच निर्दोष सुटले होते. त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातूनही तपास यंत्रणेने त्यांची सुटका केली होती. तसेच २००६मधील लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात मुंबईतील ‘जमियेतुल उलेमा हिंद’ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.