कलारुप तारुण्यच नव्हे तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 01:27 AM2020-03-08T01:27:52+5:302020-03-08T01:28:10+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुभेच्छा कार्ड या सदरात लिहिताहेत साहित्यिक जयंत पाटील...

Not just youth, but | कलारुप तारुण्यच नव्हे तर..

कलारुप तारुण्यच नव्हे तर..

Next

या शुभेच्छा कार्डासाठी पु.शि.रेगे यांच्या ‘मनवा’ या कथासंग्रहातून हा मजकूर घेतला आहे. मनू ‘त्या’ला पत्र लिहिते- फुलाच्या अगदी गाभ्यात जाण्याचा प्रयत्न करता कामा नये. तिथं एक नुसती पोकळी असणार आणि ती तशी राहाणं यातच त्या फुलांचं सौभाग्य आहे. हा इशारा जसा रसिकाला, तसाच तो फुलालाही समजायला पाहिजे. त्या फुलाचं विश्व, हे सगळं ज्याच्या हदयात नटून उभ आहे, त्याच्यासाठीच ही अनामिक पोकळी आहे. या पुढे मनू लिहिते, तुला मी जेव्हा प्रथम पाहिलं तेव्हा मला या म्हणण्याची प्रचिती आली. माझ्या हृदयपुष्पाचं सौभाग्य तुझ्यापाशी अगदी अखंड, अबाधित राहिलं ही मला खात्री पटली. तुला कदाचित वाटेल की, मी तुझ्या जीवनाशी खेळ केला. पण खरंच, रुप, मी तसं केलं नाही. सिस्टर हेलेनानं मला आपलं वारस केलं आणि आपलं हृद्गत माझ्या स्वाधिन केलं तेच मी या पत्रासोबत पाठवित आहे, तू माझा वारसा आहे. तुला विचार करता येतो, तो साध्या शब्दांत मांडता येतो. सगळ्यांना हे सांग ज्यांना कळेल ते उद्या आपले वारस ठरतील.
मी पस्तीशीला पोहचलेलो पु.शि.रेगेंची कविता कथा, कादंबरी यांचा मला चांगलाच परिचय झालेला आणि वेड लागण्याइतकी आवड सावित्री, रेणू, अवलोकिता आणि मनू या मानस नायिकांनी आम्हां वाचक मित्रांची स्वप्नेच नव्हे तर जगणेही भावश्रीमंत आणि समृद्ध केले आहे.
‘मनवा’मधील मनूबद्दल सुलभा हर्लेकर लिहितात, साहित्य प्रकारातून रेग्यांनी जीवनातील वास्तवाचे तरीही वास्तवा पलिकडचे वाटणारे, मनोज्ञ रुप पकडलेले आहे. त्यांच्या कथा आकाराने अतिशय लहान परंतु आशयघन आहेत. त्यांच्यातून ते जीवनाच्या चैतन्याची उमज कशी हळूहळू नळकत होत जाते ते दाखवतात. मनवा हा त्यांच्या कथासंग्रह रेग्यांच्या या कथा विश्वात पुरुष मनाला लागलेली चिरंतन ओढ सहजगत्या प्रगट झालेली दिसते. काव्यातील स्त्री प्रतिमा, तिचे सौंदर्य, तिच्या मनाचा ध्यास कथेत जशाच्या तसा प्रगट झाला आहे. रेग्यांच्या कथेतील स्त्री ही धीट, मोकळी आहे. तर पुरुष हा अनासक्त, कशातच न गुंतणारा स्थाणूकाय वृक्षासारखा आहे. रेगे कथांमधून चिंतनशील जाणिवांचा फारसा प्रत्येय देत नाहीत. मनू ही अपवाद. मोजक्या शब्दात परंतु कथेत येणारा प्रत्येक शब्द, प्रसंग हा त्या कथेचा अविभाज्य घटक बनून जातो. या शुभेच्छा कार्डाला माझे सन्मित्र स्व.पुणतांबेकर सर यांनी दि.४ जानेवारी १९८३ रोजी दिलेले उत्तर- फुलांची अनामिक पोकळी वास्तविक पोकळी नसून ती त्याच्या केशराचे मंदिर आहे. या केशरापर्यंत किती लोक पोचलेत! पाकळ्यांच्या रुपाला-रंगाला भुललेत लोक काही सुगंधालाही तुमच्यासारखे रसिकच पोहचू शकले आणि मंदिरात केशराच संस्पर्शाने तंद्रीभूत होऊन तुम्ही जे बीजग्रहण केलेत त्याचा प्रसव कलारुपाने हसता-खिदळता रुदन करतादेखील दिसून येतो आहे. हे कलारुप तारुण्यच नव्हे तर वृद्धत्वही पाहो हीच या मंगलप्रसंगी इच्छा.
-जयंत पाटील, जळगाव

Web Title: Not just youth, but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.