महापालिकेत आता सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:36+5:302021-04-09T04:16:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक ...

महापालिकेत आता सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेत बुधवारी अनेक नागरिक सर्रासपणे प्रवेश करत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी महापालिका व तहसील कार्यालय प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. तसेच अत्यावश्यक काम असेल तर संबंधित विभागाकडून व्हिजिटर पास घेणे सक्तीचे केले आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. मात्र शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांना येण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने शासकीय कार्यालयांमध्येदेखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नवीन आदेशात ३० एप्रिलपर्यंत शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महापालिकेत सुद्धा गुरुवारी मुख्य प्रवेशद्वारावर जाहीर नोटीस लावून नागरिकांना न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महत्त्वाची कामे असल्यास नागरिकांनी मेल, व्हॉट्सॲप किंवा इतर ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज महापालिकेत सादर करावे, असे आवाहनदेखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मनपा नगररचना विभागातील तीन कर्मचारी बाधित
महापालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित झाले असून, आता नगररचना विभागातील तीन कर्मचारी बाधित झाले आहेत. यामध्ये २ रचना सहायक तर एका शिपायाचा समावेश आहे. यामुळे नगररचना विभागातील कामकाजावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. नगररचना विभागातदेखील नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.