नऊ कोटी ५० लाख रुपयांचा निधी चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:02+5:302021-07-24T04:12:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती एखाद्या लहान गावातील शेत रस्त्यांपेक्षाही खराब झाली आहे. मनपाने पावसाळ्यापूर्वी ...

नऊ कोटी ५० लाख रुपयांचा निधी चिखलात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती एखाद्या लहान गावातील शेत रस्त्यांपेक्षाही खराब झाली आहे. मनपाने पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. या निधीतून काही कामे झाली तर काही कामे मुदत संपूनदेखील ठेकेदारांनी सुरू केली नाहीत. जळगावकरांच्या नशिबी जर चिखलमय रस्तेच द्यायचे होते तर मग नऊ कोटी ५० लाख रुपयांचा निधी चिखलात का घातला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे निधी मिळत नाही आणि दुसरीकडे निधी अशा सुमार दर्जाच्या कामावर खर्च करून, केवळ निधीचा अपव्यय मनपाने सुरू केल्याचेच दिसून येत आहे.
अनेक दिवसांपासून शहरात मनपांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यातच रामदास कॉलनी परिसरात काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेली नाल्याची संरक्षण भिंतदेखील कोसळली होती, तर सद्य:स्थितीत शहरातील दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे मक्तेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मनपाकडून सर्व कामांचे ऑडिट केले जाणार आहे. याबाबत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यांशी चर्चादेखील केली आहे.
नऊ कोटीपैकी चार कोटीमध्येच झाली दुरुस्ती
१. महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे एकूण नऊ कोटी ५० लाख रुपयांचा कामांना मंजुरी दिली होती. त्यानुसार शहरात केवळ ४ ते ५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.
२. अनेक ठेकेदारांना कार्यादेश देऊनदेखील आपल्या प्रभागात मुदत संपूनदेखील कामांना सुरुवात केली नाही तर ज्या ठेकेदारांनी कामे केली आहेत, त्या कामांची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. मनपाने रस्ते दुरुस्तीसाठी दिलेला नऊ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अक्षरश: चिखलात गेला आहे.
पायी चालता येत नाही, वाहने कसे चालविणार
१. शहरातील जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर अक्षरश: चिखल आणि गाळ जमा झाला आहे. या रस्त्यावर नागरिकांना पायी चालता येत नाही. वाहने चालविताना मोटारसायकलचे टायर अक्षरशः या चिखलात फसत असून, वाहने बंद पडत आहेत.
२. कांचन नगरातील जागृत गुरुदत्त मंदिराच्या गल्लीतील रस्ता पाहिल्यास एखाद्या पर्वतामधील पाड्यातील रस्ता तरी चांगला असेल, अशी कांचन नगर भागातील रस्त्यांची स्थिती झाली आहे.
३. केसी पार्क ते एसके ऑइल मिलदरम्यानच्या रस्त्यावर तर वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊनच मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यावर इतका चिखल आहे की वाहनधारकांना रस्त्यांच्या खोलीचा अंदाजच येत नाही. याठिकाणी दररोज चार ते पाच वाहनधारक घसरून पडत आहेत.
४. शहरातील अनेक भागात हीच परिस्थिती आहे. ज्या भागात रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. त्या भागातदेखील हीच परिस्थिती आहे. बालाजी पेठ, शनिपेठ, बळीराम पेठ, शाहूनगर, खोटेनगर, अष्टभुजानगर, आहुजानगर, शिवाजीनगर, वाघ नगरसह शहरातील वाढीव भागातदेखील हीच परिस्थिती आहे.
कोट..
शहरातील रस्त्यांचा कामांच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत एका त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्यात येणार आहे. कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त
शहरात पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम अनेक ठिकाणी सुरूच झाले नाही. तर अनेक ठिकाणी झालेल्या कामाची गुणवत्तादेखील खराब आहे. अशा कामांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. सुमार दर्ज्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांना आता चाप बसणे गरजेचे आहे.
-नितीन लढ्ढा, माजी महापौर