जळगाव : शहरी भागातील नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीवरील स्थगिती उठविण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने काढण्यात आले असून यामुळे जिल्ह्यात आता जवळपास २०० नवीन स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे या आदेशाने शहरी भागातील वर्षानुवर्षे जोडलेली, दुकानदारांनी स्वतः मालक समजून कब्जा केलेली दुकाने आपोआप काढली जाणार असून लाभार्थींची गैरसोयदेखील दूर होणार आहे.
राज्यभरात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. मात्र सदरचा आराखडा अंतिम होण्याकरिता काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही स्थगिती उठविण्यास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी आदेश काढण्यात आले.
नवीन दुकानांसाठीचा जाहीरनामा काढण्याच्या सूचना
ही स्थगिती उठविण्यात आल्याने आता २०२१-२२ या वर्षाकरीत सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत शहरी भागात नवीन स्वस्त धान्य मंजूर करण्यासाठी जाहीर करण्याची मुभा देण्यात आली आहे. या विषयी अवर सचिव गजानन देशमुख यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा विभागाचे संचालक, पुरवठा विभागाचे सर्व उप आयुक्त, सर्व अन्न धान्य वितरण अधिकारी यांना पत्र दिले आहे.
दुकानदारांची मक्तेदार येईल संपुष्टात
ज्या स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार आल्यानंतर ते दुकान रद्द करणे, परवाना निलंबित करणे, कोणी राजीनामा दिला, अशा वेगवेगळ्या कारणांनी संबंधित स्वस्त धान्य दुकान इतर नजीकच्या स्वस्त धान्य दुकानांना जोडलेले आहे, ते आता काढले जाऊन नवीन दुकानदारांना संधी मिळणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मनमानी करणाऱ्या दुकानदारांच्या मक्तेदारीला आळा बसणार आहे.