केळीच्या नवीन लागवडीला आता सीएमव्ही रोगाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:06 IST2020-07-06T00:05:07+5:302020-07-06T00:06:19+5:30
जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे.

केळीच्या नवीन लागवडीला आता सीएमव्ही रोगाचा धोका
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे.
रावेर तालुका केळीचे माहेर म्हणून ओळखला जातो. असे असले तरी या माहेरातच एकीकडे मायबाप सरकारकडून व व्यापारी वर्गाकडून केळी उत्पादकांना मेटाकुटीस आणले जात आहे, तर दुसरीकडे लहरी निसर्गाच्या आकांडतांडवाने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.
हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराधार ठरली असताना जून महिन्यातील सुरुवातीच्या पंधरवड्यात वादळी पावसाने तडाखा दिल्याने तालुक्यातील सुमारे ३५ गावांमधील ९०० हेक्टरमधील उभ्या कापणीवरील केळीबागा भुईसपाट झाल्या. यात सुमारे ७५ कोटी रुपयांची अपरिचित हानी झाली आहे. विमा कंपनीने वाºयावर सोडले असताना ९५ कोटी अर्थात १ अब्ज रूपयांचा हा तोंडी आलेला मोठा घास निसर्गाने हिरावून घेतला. हे संकट कमी की काय मृगबहार लागवडीखालील केळीबागांवर कुक्कूंभर मोझॅक व्हायरस केळीबागांच्या बांधावर घोंघावू लागला आहे. तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील एका केळीबागेत सात खोडांवर या रोगाचा प्रादुर्भाव यंदा प्रथमच आढळून आला आहे.
रावेर व यावल तालुक्यात अजून वाढता प्रादुर्भाव नसला तरी, केळी बागांमधील व बांधावरील वाढते तण व वेलवर्गीय पिकांमुळे रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव वाढून कुक्कूंभर मोझॅक व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत आहे. तणविरहीत बागा ठेवून व दर आठवड्याला न चुकता कीटकनाशकांची फवारणी करून त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जून महिन्याच्या आरंभीच पाऊस सुरू झाल्याने तणवाढ लवकर झाली. किंबहुना ढगाळ वातावरणात केणा, चिल्याची भाजी, दुधी या तणांसह बांधावरील जंगली तणाचे वेल तथा बांधालगत मका, चवळी, कपाशी, मिरची, वांगी आदी असल्यास त्यावर दर आठवड्याला इमिडा ८ मि.ली., अॅसिफेट १५ ग्रॅम, निंबोळी अर्क ५० मि.ली. असे मिश्रण १५ लीटर पाण्यात घेऊन दर आठवड्याला न चुकता फवारणी केल्यास कुक्कूंभर मोझॅक व्हायरसचा बंदोबस्त वेळीच करता येवू शकतो
-डॉ.के.बी.पाटील, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ, जळगाव