राष्ट्रवादीचे पुन्हा मराठा कार्ड

By Admin | Updated: December 1, 2014 14:35 IST2014-12-01T14:35:37+5:302014-12-01T14:35:37+5:30

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने घेतला आहे.

NCP's Maratha card again | राष्ट्रवादीचे पुन्हा मराठा कार्ड

राष्ट्रवादीचे पुन्हा मराठा कार्ड

सुशील देवकर■ जळगाव

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने घेतला आहे. आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याकडे पक्षबांधणीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा कार्ड वापरीत पक्षाला बळ देण्याचा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात सबकुछ डॉ.सतीश पाटील
विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ.सतीश पाटील हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. डॉ.पाटील यांचे पवार कुटुंबीयांशी असलेले घनिष्ठ संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही डॉ.पाटील यांनाच पारोळ्यात पक्षाने तिकीट देत विश्‍वास दाखविला. 
त्यांनीही निवडून येत विश्‍वास सार्थ ठरविला. रविवारी मुंबई येथे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सर्व आजी-माजी आमदार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात पक्ष बांधणीची जबाबदारीही पक्षनेतृत्त्वाने डॉ.सतीश पाटील यांच्यावरच सोपविली. त्यासाठी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) व शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविली आहे. 
आता तेच उर्वरित कार्यकारिणी जाहीर करणार आहेत. मनपात कुणाला पाठिंबा द्यायचा याचेदेखील अधिकार त्यांनाच दिले आहेत. एकंदरच आता जिल्हा राष्ट्रवादीत सबकुछ आमदार डॉ.सतीश पाटील अशी स्थिती झाली आहे. 
बदल कशासाठी?
केवळ मराठय़ांचा पक्ष असा शिक्का पुसण्यासाठी व अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी गफ्फार मलिक यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. 
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी भाजपा व शिवसेना या पक्षांना राष्ट्रवादीपेक्षा भरघोस यश मिळाले. 
त्या तुलनेत मुस्लीम जिल्हाध्यक्ष असतानाही राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार असलेला मुस्लीम मतदारही पक्षापासून दुरावला. 
मराठा मतदारही पक्षापासून दूर जात असल्याचे पक्षनेतृत्वाला जाणवल्याने पुन्हा मराठा कार्ड वापरले गेले आहे. त्यातच पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी जिल्ह्यात आक्रमक नेतृत्वाची गरज होती. ती गरजही डॉ.पाटील यांच्या नियुक्तीमुळे पूर्ण झाली आहे. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून बदल करणे टाळण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर जिल्हाध्यक्ष मनोज दयाराम चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र गफ्फार मलिक यांनी जिल्हाध्यक्षपदाचा (ग्रामीण) राजीनामा दिलेला नव्हता. त्यामुळे अखेर त्यांना या पदावरून हटविण्यात आले आहे. डॉ.सतीश पाटील पक्ष संघटन कशाप्रकारे मजबूत करतात, याकडे लक्ष आहे. 
-------------
विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून निवडणूक लढविलेले जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक हे पराभूत झाले. तेथे त्यांनी चांगली मते मिळविली असली तरीही आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही ते पक्षासाठी फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्यातच विधानपरिषद निवडणुकीच्यावेळी भाजपाच्या उमेदवाराला फायदा व्हावा या हेतूने सेटिंग केल्याचा ठपका तत्कालीन पालकमंत्री यांच्यासह जिल्हाध्यक्षांवर ठेवण्यात आला होता. स्वत: तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी याबाबत अहवाल मागवून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. ती कारवाई झाली नसली तरीही जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना तेव्हाच सुरुवात झाली होती. 

Web Title: NCP's Maratha card again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.