काँग्रेसच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा परिवार संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:14+5:302021-02-05T06:00:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या ...

काँग्रेसच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा परिवार संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ११ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत रावेर मतदारसंघातही आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेसच्या एकमेव मतदारसंघातही राष्ट्रवादीने पक्षवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. दोन दिवस परिवार संवाद अंतर्गत विविध मतदारसंघात जयंत पाटील हे बैठका घेणार आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोनही पक्ष स्वतंत्र लढले होते. २०१९ मध्ये मात्र, आघाडीत एकत्रीत लढले, यात काँग्रेसच्या वाट्याला रावेर -यावल मतदारसंघाची एकमेव जागा आली होती. उर्वरित दहा जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार लढले. जागा वाटपांवरून दोनही पक्षांचा वाद वरिष्ठ पातळीवर गेला होता. काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीतही होते, वरिष्ठांशीही याबाबत वारंवार चर्चा झाल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला एकमेव रावेर मतदारसंघ आला होता. यात काँग्रेसने यश मिळविले. मात्र, राष्ट्रवादीला हवे तसे जिल्ह्यात यश मिळविता आले नाही. अमळनेर मतदारसंघ वगळता सर्वच मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्रित आहेत. सोबत शिवसेनाही असल्याने प्रथमच हे नवीन समिकरण जिल्हाही अनुभवत आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीतील जागा वाटपांचा वाद वर्षानुवर्षे चर्चेत राहिला आहे. त्यात रावेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बैठक घेत असल्याने हा या परिवार संवादातील चर्चेचा विषय झाला आहे.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे असे होते चित्र
राष्ट्रवादी - दहा जागा लढले, एक जिंकले (अमळनेर)
काँग्रेस - एक जागा लढले आणि जिंकले (रावेर)
काँग्रेसमोर मित्र पक्षाचेचे आव्हान?
रावेर हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाने निधन झाल्याने भाजपसमोरही या मतदारसंघात मातब्बर चेहरा देण्याचे एक आव्हान आहेच, सद्यस्थिती काँग्रेसमोर या पारंपारिक मतदारसंघात विरोधक दिसत नसले तरी राष्ट्रवादीचेच त्यांना आव्हान राहील का? असेही एक राजकीय चित्र जयंत पाटील यांच्या बैठकीने निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
असा आहे दौरा
११ फेबु्वारीला निम्न तापी प्रकल्पाची पाहणी, अमळनेरात बैठक, पाडळसरे येथे परिवार संवाद कार्यक्रम, पारोळा, पाचोरा, जामनेर येथे आढावा बैठका, १२ फेबु्वारीला भुसावळ, मुक्ताईनगर, फैजपूर, चोपडा येथे आढावा बैठका असा जयंत पाटील यांचा दौरा राहणार आहे.
कोट
हा राष्ट्रवादी पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. रावेर मतदारसंघात त्यांनी कार्यक्रम घेतल्यावर आमदार या नात्याने शिरीष चौधरी हे जयंत पाटील यांची भेट घेऊ शकतात. जळगावात त्यांचा कार्यक्रम असल्यास जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांची भेट घेऊ शकतो. प्रत्येक पक्षाला पक्षवाढीचे स्वातंत्र आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघात स्वतंत्र ताकद वाढविण्यावर सर्वांचाच भर आहे. - ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस