चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा; एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 14:53 IST2022-10-10T14:50:42+5:302022-10-10T14:53:09+5:30
धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा; एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका
प्रशांत भदाणे, लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील. पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात. परंतु, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्षच संपून टाकावा. तुम्ही पण संपले आणि ते पण. अशी स्थिती निर्माण होता कामा नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी खडसे यांनी शिवसेनेतील वादावर भाष्य केलं. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेच्या वाढीसाठी घालवलं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती. बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे. शिवसेना पक्षात दुभंगला आहे, पूर्णतः मोडला गेला आहे. ही बाब फक्त राज्याच्याच नाही तर शिवसेनेच्या दृष्टीनेही हिताची नाही. शिवसेनेवर हल्ला झाला. या पक्षाचे तुकडे झाले म्हणून भाजपला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"