नशिराबादला निवडणुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:41+5:302021-09-07T04:21:41+5:30

नशिराबाद : येथे मोठ्या प्रतीक्षेनंतर नगरपरिषदेला हिरवा कंदील मिळाला. गावाचा विकास होणार म्हणून नव्या उमेदीने तरुण वर्गात आनंदाचे वातावरण ...

Nasirabad awaits elections | नशिराबादला निवडणुकीची प्रतीक्षा

नशिराबादला निवडणुकीची प्रतीक्षा

नशिराबाद : येथे मोठ्या प्रतीक्षेनंतर नगरपरिषदेला हिरवा कंदील मिळाला. गावाचा विकास होणार म्हणून नव्या उमेदीने तरुण वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाच्या व उत्साहाच्या भरात ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील उमेदवारांनी संघटितपणे उमेदवारी अर्ज माघारी घेऊन इतिहास रचला. त्यामुळे निवडणूक झाली नाही. आता तरी नगरपरिषद निवडणूक होईल या आशेने इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झाली. बैठकी, चर्चांना उधाण आले. कोणत्या प्रभागात कोण याबाबत खलबते सुरू झाली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी कंबर कसून, इच्छुकांनी मतदारांशी हितगूज व संपर्क वाढविले असल्याचे चित्र आहे.

इच्छुकांची एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू, तर ग्रामस्थही गाव विकासाच्या स्वप्नात रंगले. नगर परिषद झाली म्हणजे विविध सुविधा मिळणार या आशेवर ग्रामस्थ आहेत. येत्या दोन-चार महिन्यांत निवडणूक होणार अशी आशा असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लांबणीवर पडल्या. त्यामुळे पुन्हा नशिराबादकरांवर नाराजीचे सावट आहे. निवडणूक केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज गावाला प्रतिनिधीच नाही अशी परिस्थिती आहे. लोकसंख्या सुमारे पन्नास हजारावर आहे. गावकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासकही नियुक्त आहेत; पण त्यांची अनुपस्थिती असते. त्यामुळे सध्याचे गावावर नियंत्रण कोणाचे? असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गावातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मूलभूत समस्यांचा प्रश्न चर्चिला जात आहे. यावर तोडगा निघणार कधी? त्याची प्रतीक्षा मात्र कायम आहे.

Web Title: Nasirabad awaits elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.