डोळ्यात मिरचीची पूड फेकत केला एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:24+5:302021-09-22T04:20:24+5:30
जळगाव / नशिराबाद : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटताच धम्मप्रिया मनोहर सुरडकर (वय १९) याच्यावर गोळीबार झाला असून, त्यात तो ...

डोळ्यात मिरचीची पूड फेकत केला एकाचा खून
जळगाव / नशिराबाद : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटताच धम्मप्रिया मनोहर सुरडकर (वय १९) याच्यावर गोळीबार झाला असून, त्यात तो जागीच ठार झाला, तर धम्मप्रियाचे वडील मनोहर आत्माराम सुरडकर (वय ४५, रा. पंचशीलनगर, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. समीर शेख जाकीर व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी गोळीबार व चाकूने वार केल्याची माहिती जखमी मनोहर सुरडकर यांनी ‘लोकमत’ ला दिली. मंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावर सुनसगाव पुलानजीक ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्यावर्षी ११ ऑक्टोबर रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाचा पंचशीलनगरात खून झाला होता. त्या गुन्ह्यात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. हा खून धम्मप्रिया याने केल्याचा आरोप होता. मंगळवारी तो जामिनावर कारागृहातून बाहेर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कैफचा भाऊ समीर, रेहान व आणखी एक असे तीन जण त्याच्यावर दबा धरून होते. धम्मप्रिया व त्याचे वडील दोघे जण दुचाकीने घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ अचानक आलेल्या तिघांनी मिरचीपूड डोळ्यात टाकली आणि धम्मप्रियावर गोळीबार केला, तर मनोहर यांच्यावर चाकूने वार केले. यात धम्मप्रिया जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मृत पिता-पुत्रांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.