भडगावात ८३ अतिक्रमण धारकांना पालिकेच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:22+5:302021-07-02T04:12:22+5:30
मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८९, व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ ...

भडगावात ८३ अतिक्रमण धारकांना पालिकेच्या नोटिसा
मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८९, व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये भडगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकाने, व्यावसायिक आस्थापना या मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्यापारी संकुलात असून, तेथील व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व अतिक्रमण करून रहदारीस अडथळा होईल, अशा रितीने दुकानाच्या बाहेर ६ ते ८ फुटापर्यंत दुकाने, पत्रे वाढविलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडचण निर्माण होते.
याबाबत वारंवार कळवूनदेखील व्यापाऱ्यांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा रितीने दुकाने मांडलेली आहेत. त्यामुळे भडगाव नगरपरिषदेचे ख्मुयाधिकारी विकास नवाळे यांनी दिनांक ३० जून रोजी या मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत मंजूर नकाशाच्या बाहेरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, अन्यथा नगरपरिषदेच्या प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याबाबत व याबाबतची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येऊन दुकानाच्या बाहेरील साहित्य नगरपरिषदेकडे जप्त करण्यात येईल व त्याकामी होणारा खर्च अतिक्रमण धारकांच्या खाती टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे. ही माहिती नगरपरिषदेचे लिपिक नितीन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.