महापालिका प्रशासनाने अखेर जेके पार्कची जागा घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST2021-04-08T04:16:26+5:302021-04-08T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजी उद्यान परिसरातील महापालिकेच्या मालकीची जेके पार्कची जागा अखेर महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतली ...

महापालिका प्रशासनाने अखेर जेके पार्कची जागा घेतली ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजी उद्यान परिसरातील महापालिकेच्या मालकीची जेके पार्कची जागा अखेर महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी जॅकी पार्कच्या प्रवेशद्वाराला सील करून ही जागा ताब्यात घेतली.
शहरातील मेहरून तलावालगत असलेली व जे. के. डेव्हलपर्सला भाडेतत्त्वावर दिलेली महापालिकेची १८१ चौ.मी. जागा खाली करण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासनाने जे. के. डेव्हलपर्सला दिले होते. ‘लोकमत’ने अनेक दिवसांपासून हा विषय लावून धरला होता. महापालिकेच्या प्रशासनाने जे. के. डेव्हलपर्सला दोन वेळा ८१ ब ची नोटीस बजावून, ही जागा खाली करण्याचा सूचना दिल्या होत्या. अखेर महापालिकेच्या उपायुक्तांनी कारवाई करीत बुधवारी ही जागा ताब्यात घेतली.
काय होते प्रकरण...
शिवाजी उद्यानालगत असलेल्या जे. के. पार्कची जागा १९८९ मध्ये जे. के. डेव्हलपर्सला ३० वर्षे करारांतर्गत देण्यात आली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ रोजी संपली होती. याबाबत संबंधित भाडेकरूला जानेवारी २०२० मध्ये ८१ ब ची नोटीस बजावण्यात आली होती. वर्षभर महापालिकेच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्येही महापालिकेने जे. के. डेव्हलपर्स यांना नोटीस बजावली.