जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:10+5:302021-08-20T04:21:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लांबलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने येथे हालचालींना ...

जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लांबलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने येथे हालचालींना वेग आला आहे. कोरोना महामारीमुळे ही निवडणूक वर्षभर लांबली. जिल्हास्तरावरील सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय पॅनलचा राग आळवला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातही उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून थेट ग्रामीण राजकारणाच्या प्रवेशदारातच उभे राहता येत असल्याने उमेदवारीसाठीच मोठी चुरस होत असते. गेल्या वेळी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाल्याने चाळीसगाव तालुक्यात दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजयी गुलाल उधळला होता. अर्थात गत निवडणुकीत नाट्यमय घडामोडीही घडल्या होत्याच. माजी आमदार राजीव देशमुख यांनी विविध कार्यकारी सोसायटी गटातून तर वाडिलाल राठोड यांनी भटक्या-विमुक्त गटातून बाजी मारली होती.
चौकट
विविध कार्यकारी सोसायट्यांचे ७८ ठराव
जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सोसायटी गटात चाळीसगाव तालुक्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. सहा महिन्यांपूर्वीच एकूण ८१ पैकी ७८ ठराव बँकेकडे पाठविण्यात आले. तीन सोसायट्यांवर प्रशासक असल्याने येथील ठराव मिळाले नसल्याचे साहाय्यक निबंधक कार्यालयाचे प्रशासनाने सांगितले.
चौकट
राजीव देशमुख, राजेश राठोड या दावेदारांपैकी गत निवडणुकीत राजीव देशमुख यांनी सोसायटी गटातून ४२ मते मिळवत विजय संपादन केला होता. भाजपचे अधिकृत उमेदवार कैलास सूर्यवंशी, भाजपचेच बंडखोर व खासदार उन्मेष पाटील यांचे समर्थक मनोज साबळे यांना पराभव पत्करावा लागला. कैलास सूर्यवंशी यांना १७ तर मनोज साबळे यांना २२ मते मिळाली होती.
१..संभाव्य निवडणुकीसाठीही सोसायटी गटातून राजीव देशमुख हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याच गटातून त्यांचे वडील अनिल देशमुख व काका प्रदीप देशमुख यांनीही जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या पाच वर्षांत बँकेत शेतकरी हितासाठी संचालक म्हणून काम केले आहे. त्याची पावती संभाव्य निवडणुकीतही मिळेलच, अशी प्रतिक्रिया राजीव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
२. वाडिलाल राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी जि. प. सदस्य राजेश राठोड यांची संचालक म्हणून वर्णी लागली होती. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भटक्या-विमुक्त गटातून ते इच्छुक आहेत.
महत्त्वाची चौकट
आमदार व खासदारांची भूमिका निर्णायक
जिल्हा स्तरावर सर्वपक्षीय पॅनलचा सूर व्यक्त होत असल्याने आमदार मंगेश चव्हाण व खासदार उन्मेष पाटील यांची भूमिका चाळीसगावसाठी निर्णायक ठरणार आहे. गत निवडणुकीत बंडखोर उमेदवार मनोज साबळे यांना उन्मेष पाटील यांनी रसद पुरविल्याची चर्चा राजकीय पटलावर झाली होती. त्यामुळे मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील काय भूमिका घेतात, याचेही औत्सुक्य आहे.
.
- माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वपक्षीय पॅनलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चाळीसगावातील उमेदवारीबाबत ते जो निर्णय घेतील तो मान्य राहील. त्यादृष्टीने ताकदीने काम करू, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्टपणे सांगितले.