मतीन शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : तालुक्यातील २८ हजार १३१ कृषी खातेदार शेतकऱ्यांपैकी ९८१७ शेतकऱ्यांनी ई -पीक पेरा नोंदणी केली आहे. विविध समस्यांवर मात करीत आतापर्यंत ३५ टक्के शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या नोंदणीला वाढीव मुदत देण्यात आली आहे. अशात शेतकऱ्यांना विविध समस्यांवर मात करून ई-पीक पेरा नोंद करण्याचे, तर प्रशासनाला उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान आहे.
शेतकऱ्यांना आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांच्या मोबाइलवर ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक शेतकरी अशिक्षित आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नाही. अनेकांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाहीत. नेटवर्क, सर्व्हर डाउन, तांत्रिक अडचणी आदी समस्यांमुळे ई-पीक पेरा नोंदणी करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या समस्यांवर मात करीत तालुक्यातील ३५ टक्के शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत ई-पीक नोंदणी केली आहे. पीक नोंदणीबाबत शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहता १४ सप्टेंबरपर्यंत असलेल्या मुदतीस वाढ देण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून पीक नोंदणी करता येणार आहे.
शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्यांद्वारे करण्याच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्जही दिले जाईल. तलाठी संख्या कमी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा आक्षेप असायचा. अशात पीक पेरणीची रिअल टाइम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे.
तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीकविमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. ई-पीक पेरा नोंदणीचे हे फायदे जरी असले तरी सध्या शेतकऱ्यांना ही नोंदणी करण्यास येणाऱ्या अडचणी मोठ्या आहेत. पीक नोंदणीसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले ॲप चालवता येत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. तसेच महसूल विभागाच्या वतीने तुलनात्मकदृष्ट्या कमी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
ई-पीक नोंदणीसाठी येत असलेल्या अडचणी
अनेक शेतकरी अशिक्षित आहेत.
बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाले नाही.
बहुतांश शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नाही.
अनेक शेतकऱ्यांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाहीत.
गाव व शेतीशिवारात मोबाइल नेटवर्क मिळत नाही.
सर्व्हर डाउन असल्यास नोंद होत नाही.
तांत्रिक अडचणी आदी समस्या आहेत.
तालुक्यातील स्थिती
तालुक्यातील एकूण गावे- ८१
एकूण कृषी खातेदार शेतकरी- २८,१३१
नोंदणी केलेले खातेदार शेतकरी- १०,३७८
ॲक्टिव्ह खातेदार शेतकरी- ९८१७