आई लेकीकडे गेली, घरी मुलाने आत्महत्या केली
By विजय.सैतवाल | Updated: May 20, 2024 17:26 IST2024-05-20T17:22:34+5:302024-05-20T17:26:04+5:30
वखारमध्ये काम करणारा हर्षल सोनार हा तरुण विठ्ठलपेठ भागात आईसह राहत होता. त्याची आई विवाहित मुलीकडे पारोळा येथे गेल्या होत्या

आई लेकीकडे गेली, घरी मुलाने आत्महत्या केली
जळगाव : आई पारोळा येथे विवाहित मुलीकडे गेलेली असताना घरी मुलगा हर्षल नंदकिशोर सोनार (२५, रा. विठ्ठल पेठ, जुने जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २० मे रोजी सकाळी त्याची आई घरी परतली त्यावेळी उघडकीस आली.
वखारमध्ये काम करणारा हर्षल सोनार हा तरुण विठ्ठलपेठ भागात आईसह राहत होता. त्याची आई विवाहित मुलीकडे पारोळा येथे गेल्या होत्या. तेथून त्या रविवार, १९ मे रोजी रात्री परतल्या व त्यांच्या बहिणीकडे थांबल्या होत्या. त्याच रात्री हर्षल याने विठ्ठल पेठेतील राहत्या घरी गळफास घेतला. सकाळी नळाला पाणी येणार असल्याने आईला हर्षलचा मावस भाऊ दिनेश भामरे हा घरी सोडण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या आईने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले तर हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला व त्यांनी आक्रोश केला. शेजारील मंडळींना व दिनेशला त्यांनी बोलवले. तसेच शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोकॉ विजय निकम तेथे पोहचले व हर्षलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
वर्षभरापूर्वी वडिलांचे तर दोन वर्षापूर्वी भावाचे निधन
हर्षलच्या वडिलांचे गेल्या वर्षीच ह्रदयविकाराने निधन झाले तर दोन वर्षांपूर्वी त्याच्या लहान भावाचेही निधन झाले आहे. त्यामुळे हर्षल हा आईचा एकटा आधार होता. आता त्यानेही टोकाचा निर्णय घेत जीवन संपवल्याने आईचा एकुलता एक आधार हरवला आहे.
लग्नासाठी मुलीचा शोध
हर्षल हा अविवाहीत होता. त्याच्या लग्नासाठी मुलीचादेखील शोध सुरू होता. मात्र त्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. बहिणीचाही एकुलता एक भाऊ यामुळे हिरावला गेला आहे.