जळगाव : नवजात बालिकेला पाहण्यासाठी जाणारा पिता आणि आजी हे अपघातात ठार झाल्याची घटना शिवना जि औरंगाबाद या गावाजवळ रविवारी दुपारी १२ वाजता घडली. यात आठ वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली. पिता आणि आजी हे पहूर कसबे (ता. जामनेर) येथील रहिवासी होते.सागर सुभाष थोरात (३२) व आजी मालतीबाइ सुभाष थोरात (६०) अशी या ठार झालेल्या पिता व आजीची नावे आहेत तर निशा राहूल थोरात (८) ही बालिका बचावली आहे.प्राप्त माहिती नुसार सागर थोरात याला पाच दिवसांपूर्वी कन्यारत्न झाले.पत्नी लाखनवाडा जि. बुलढाणा येथे होती. रविवारी पाचवीचा कार्यक्रम होता. बाळाला पाहण्यासाठी सागर व त्याची आई मालतीबाई थोरात व पुतणी निशा राहूल थोरात असे तीन जण खाजगी वाहनाने रविवारी सकाळी ९ वाजता बुलढाण्याकडे निघाले.दुपारी बाराच्या सुमारास बुलढाणा रस्त्यावरील शिवाना गावाजवळ दुचाकी व रिक्षा वाहनाचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली.यात मालतीबाई सुभाष थोरात या रिक्षातून खाली पडल्याने जागीच ठार झाल्या. तसेच सागर व निशा यांना तेथून उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.उपचारादरम्यान सागर याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. निशा या चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. या दु:खद घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई आणि मुलावर काळाने घातली झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 21:10 IST