जळगाव : विविध तक्रारींमुळे जिल्ह्यातील जवळपास ३०० अंगणवाडीसेविकांनी शासनाकडून त्यांना मिळालेले मोबाईल प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यात जामनेर तालुक्यात सोमवारी १९ अंगणवाडी सेविकांनीही हे मोबाईल परत केले. पोषण ट्रॅकर इंग्रजीतून असणे, मोबाईल चार्ज न होणे, मेमरी कमी असणे, स्फोट होण्याचा धोका आदी कारणे यामागे अंगणवाडीसेविकांनी सांगितली आहेत.
गेल्याच महिन्यात पोषण ट्रॅकरला विरोध म्हणून अनेक अंगणवाडी सेविकांनी या कामांवर बहिष्कार टाकला हेाता. अंगणवाड्यांचे कामकाज डिजिटल व्हावे यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आला आहे, मात्र, पोषण ट्रॅकर याद्वारे इंग्रजीतून माहिती भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांची मोठी अडचण निर्माण झाली होती शिवाय हे ॲप मराठीतून व्हावे, या मागणीसाठी आंदोलनेही केले होते. आता या मोबाईलच्या विविध अडचणी समोर आल्या आहेत. जामनेरात अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनकडून राज्य कार्याध्यक्ष अमृतराव महाजन यांच्या उपस्थितीत हे मोबाईल परत करण्यात आले.
एकूण अंगणवाड्या : ३६४०
अंगणवाडी सेविका : ३४२०
किती जणींनी केला मोबाईल परत -
२५० ते ३००
म्हणून केला मोबाईल परत
शासनाकडून मिळालेल्या मोबाईलमध्ये मेमरी कमी होती तो वारंवार हँग होत होता शिवाय चार्जिंग होत नव्हता, कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो इतका गरम व्हायचा, व्हॉट्स ॲप त्यावर चालत नव्हते. त्यामुळे फोटो पाठविणे कठीण होते. त्याद्वारे व्यवस्थित माहिती जात नसल्याने अखेर हा मोबाईल परत केल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
कामांचा व्याप
अंगणवाडी अंतर्गत असलेल्या स्तनदा माता, गरोदर महिला, शून्य ते सहा वर्ष, १ ते ३ वर्षांची बालके, किशोरवयीन मुले यांची दर महिन्याला माहिती भरून पाठवावी लागते. यासह कोविडची जनजागृती, तसेच केंद्र सरकारकडून आलेल्या धान्याचे घरोघरी वाटप करणे, सर्व्हेक्षण, लसीकरण आदी कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागत आहेत.
आता आम्हाला रजिस्टरही देण्यात आलेले नाही. मोबाईलच्या असंख्य अडचणी आहेत शिवाय पोषण ट्रॅक्टरचीही अडचण आहेच एकीकडे कामांचा व्याप वाढत असताना दुसरीकडे या मोबाईलच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अखेर तो परत करण्याचा निर्णय घेतला.
- शारदा बाबूराव पाटील, अंगणवाडी सेविका शहापूर
मोबाईल व्यवस्थित चालत नाही. त्याद्वारे माहिती पाठविली जात नाही. फोटा पाठविले जात नाहीत. तो बंद पडून असतो. त्यामुळे मोबाईल जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जामनेर तालुक्यातून १९ अंगणवाडी सेविकांनी सोमवारी मोबाईल जमा केले आहे.
कोट
पोषण ट्रॅकर मराठीतून असावे, यासह अंणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण शासनाकडे पोहोचविणार आहोत. त्यामुळे कामे खोळंबत असल्याची स्थिती आहे.
- देवेंद्र राऊत, महिला व बालकल्याण अधिकारी, जि. प