एकाच वर्गात शिकणारे अल्पवयीन मुलगा, मुलगी बेपत्ता
By विजय.सैतवाल | Updated: December 29, 2023 18:10 IST2023-12-29T18:09:51+5:302023-12-29T18:10:08+5:30
एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल.

एकाच वर्गात शिकणारे अल्पवयीन मुलगा, मुलगी बेपत्ता
जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातून एकाच वर्गात शिकणारे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि मुलगी हे गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील मुलगा व मुलगी एकाच वर्गात शिकतात. गुरूवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी पसिरात शाळेत असताना हे दोन्ही जण बेपत्ता झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु दोघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दोन्ही अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत.