गिरणाईच्या 'लेका'ची आॅस्ट्रेलियात भरारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 20:53 IST2020-09-08T20:53:10+5:302020-09-08T20:53:17+5:30
रोवला कर्तृत्वाचा झेंडा: निवडणूक आयोगात उच्चपदावर झाली निवड

गिरणाईच्या 'लेका'ची आॅस्ट्रेलियात भरारी !
चाळीसगाव: सतत परिश्रम करण्याची तयारी. काही तरी करुन दाखवण्याची जिद्द जगाच्या सीमारेषा पुसून टाकतांना कर्तृत्वाचे निशाणही दिमाखाने रोवत असते. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बुद्रुक येथील भूमीपुत्राने हेच अधोरेखित केले असून, त्यांची आॅस्ट्रोलियातील निवडणूक आयोगात प्रकल्प व्यवस्थापन प्रमुखपदी निवड झाली आहे. सिडनी येथील कार्यालयात नुकताच त्यांनी पदभार स्विकारला आहे. जयंत बाबुसिंग पाटील (कच्छवा) हे त्यांचे नाव. अभिमानास्पद असलेल्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खान्देशातील नवी वाट चालू पाहणाऱ्या काही तरुणांनी आपल्या कर्तृत्वाची चमक सातासमुद्रापार दाखवली आहे. चाळीसगावचे डॉ. अर्जुन देवरे हे भारतीय परराष्ट्र सेवेत विदेश राजदूत म्हणून कार्यरत आहे. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी भरारी घेऊन खान्देशाची मान उंचावली आहे. भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर बाबुसिंग पाटील यांचे जयंत हे सुपूत्र आहे.
....अन जिंकला तिरंगा !
निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापन प्रमुखाच्या निवडीची प्रक्रिया चुरशीची होती. या महत्वाच्या पदावर आपली निवड व्हावी म्हणून अनेक देशातील उमेदवार स्पर्धेत होते. मात्र निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी भारतीय असाणाºया जयंत पाटील यांच्या नावावर निवडीची मोहोर उमटवली. जयंत पाटील यांच्या निवडीमुळे पुन्हा एकदा सातासमुद्रापार तिरंगा डौलाने फडकला आहे.
स्थानिक व राज्य पातळीवरील निवडणुकांचे नियोजन, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे, माहीती-तंत्रज्ञान विभागातील प्रणालींची देखरेख, आॅस्ट्रेलिया संसदेने ठरवुन दिलेले नियम व दिशा निर्देश यांचे पालन करण्याची जबाबदारी जयंत पाटील हे निवडणुक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतील. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर आॅस्ट्रेलियातील न्यु साउथ वेल्स या राज्यातील सप्टेंबरमधे होणाºया निवडणुका वर्षभर पुढ़े ढकलण्याच्या व त्यासाठी इंटरनेट वोटिंग प्रणालीचा वापर करण्याच्या निर्णयप्रक्रीयेत जयंत पाटील यांचा महत्वाचा सहभाग आहे.
आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना दिले ६० संगणक
वरखेडे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यास कक्षा व्यापक व्हाव्यात. यासाठी जयंत पाटील यांनी ६० संगणक दिले आहेत. आपल्या मातीतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी आपल्या दातृत्वाचा हात पुढे केला आहे.
जयंत पाटील यांनी बार्कलेज, मेरील लिंच व मॉर्गन स्टॅनली आदी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्येही उपाध्यक्ष पदाची जबाबदारी निभावली आहे. सध्या या भागातील विद्यार्थी संगणक क्षेत्रात ही भरारी घेत आहेत.आपल्या देशातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून जयंत पाटील यांची नेहमी धडपड असते.
गिरणाईच्या लेकाची भरारी
वरखेडे हे गिरणाच्या खोºयात वसलेले दोनशे उंबऱ्यांचं गाव. जयंत पाटील याच मातीतले. त्यांचे वडिल बाबुसिंग पाटील हे स्टेट बँकेत जनरल मॅनेजर पदावर होते. दोन वषार्पूर्वी ते निवृत्त झाले. सध्या ते वरखेडे येथे सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. बाबुसिंग पाटील यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षीत केले.या आपल्या कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर जयंत पाटील यांनी प्रगतीचे अनेक शिखरे पादाक्रांत करीत आॅस्ट्रेलियातील निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापक पदापर्यंत धडक दिली.त्यांचे शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथे झाले आहे.