यावलमधील मध्यरात्रीची घटना : चोरटा निघाला पेट्रोलपंपावरील कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:14+5:302021-06-04T04:14:14+5:30

यावल : येथील चोपडा रस्त्यावरील डी.के. पेट्रोल पंपावरील रात्रीच्या ड्युटीवरील तीन सेल्समनच्या ४४ हजार रुपये असलेल्या तीन ...

Midnight incident in Yaval: A petrol pump employee went on a rampage | यावलमधील मध्यरात्रीची घटना : चोरटा निघाला पेट्रोलपंपावरील कर्मचारी

यावलमधील मध्यरात्रीची घटना : चोरटा निघाला पेट्रोलपंपावरील कर्मचारी

यावल : येथील चोपडा रस्त्यावरील डी.के. पेट्रोल पंपावरील रात्रीच्या ड्युटीवरील तीन सेल्समनच्या ४४ हजार रुपये असलेल्या तीन बॅगा पंपावरीलच कामगार त्याच्या एका साथीदारासह मध्यरात्री चोरून नेत असताना सेल्समनला जाग आल्याने चोरीचा प्रयत्न फसला. याआधी सेल्समन व बॅग चोरट्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर सेल्समनने त्या बॅगा चोरट्यांकडून हिसकावून घेतल्या. चोरटे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील चोपडा रस्त्यावरील डी.के. पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळपर्यंत सेल्समन विजय गणेश सोनवणे, हसनअली हैदरअली, अब्रार रहीम पटेल यांची ड्युटी होती. या तिघा सेल्समननी अनुक्रमे ३० हजार, सहा हजार व आठ हजार अशा एकूण ४४ हजार रुपये असलेल्या तीनही बॅगा सेल्समन रूममधील टेबलवर ठेवून झोपले होते. मध्यरात्री सुमारे पाऊण वाजेच्या सुमारास टेबलवरील काही तरी खाली पडल्याचा आवाज सेल्समन विजय सोनवणे यास आला. यामुळे विजयला जाग आली. तेव्हा पेट्रोलपंपावरच कामावर असलेला नुसरत सलीम शेख रा.खिर्नीपुरा हा पैशांच्या बॅगा घेऊन रूमबाहेर पडत असल्याचे दिसले.

चोरट्यांकडून हिसकावल्या तिन्ही बॅगा

रूमबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर अदनान नबी देशमुख रा.यावल हा बसलेला होता. नुसरत सलीम शेख हा मोटारसायकलवर बसण्यापूर्वीच विजयने खोली बाहेर येऊन त्याच्याकडील तिन्ही बॅगा हिसकावल्या. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यात दोघेही चोरटे मोटारसायकलवर बसून पसार झाले. साथीदारांना मदतीसाठी ओरडून आवाज दिले. मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांना आवाज आला नसल्याने त्यांना जाग आली नाही. त्यानंतर खोलीत येऊन साथीदारांना झोपेतून उठवून ही घटना सांगितली. तसेच पंपमालक परवेजखान यांनी फोनवर माहिती दिल्याचे विजय सोनवणे याने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. दोघा चोरट्यांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदनान नबी देशमुख व पेट्रोलपंपावरील कर्मचारी असलेला नुसरत सलीम शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. फौजदार पठाण तपास करीत आहेत.

सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे स्वीच केले ऑफ

पेट्रोल पंप परिसरात सेल्समन रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. पंपलुटीतील मुख्य संशयित आरोपी नुसरत सलीम शेख हा पंपावरच काम करीत असल्याने त्यास सीसीटीव्हीसंदर्भात संपूर्ण माहिती होती. समोरील कॅमेऱ्याची दिशा बदलवणे शक्य नसल्याने त्याने पंप कार्यालयामागील कॅमेऱ्याची दिशा पूर्वीच बदलवून टाकली होती. यावरून त्याने पंपलुटीची पूर्वतयारी केली होती. त्यामुळे तो परिसरातील कोणत्याही कॅमेऱ्यात टिपला गेला नाही. परिणामी त्याने पाठीमागून प्रवेश केल्याचा संशय पंप कार्यालयातून व्यक्त करण्यात येत आहे. तो थेट सेल्समन रूममध्ये दरवाजा ढकलून प्रवेश करीत असल्याचे दिसते. डोक्यावर टोप व तोंडास पूर्ण रुमालाने झाकलेल्या चेहऱ्याने सर्वप्रथम कॅमेऱ्याचे स्वीच रात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी बंद केल्याचेही कॅमऱ्याने टिपले आहे. झटापटीनंतर सर्व सेल्समननी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता स्वीच बंद असल्याचे दिसले.

Web Title: Midnight incident in Yaval: A petrol pump employee went on a rampage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.