पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील यांच्यासह लघुउद्योग भारतीचे किशोर ढाके, उद्योजक अरुण बोरोले, किशोर चौधरी, अरविंद दहाड उपस्थित होते. उद्योजकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या बैठकीत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय धुळे येथे असल्यामुळे जळगावच्या उद्योजकांना खूप अडचणी येतात. जळगाव येथे हे कार्यालय सुरू करावे अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. यावर उद्योगमंत्र्यांनी अतिरिक्त प्रादेशिक अधिकारीपद निर्मित करण्याचा व त्यात जळगावचा समावेश करण्याला मान्यता दिली. तर चिंचोली येथे सबस्टेशन नसल्याने येणाऱ्या अडचणी देखील उद्योजकांनी मांडल्या.
उद्योजकांंना सवलती देखील मिळणार
जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असल्याने उद्योजकांना सवलती मिळत नाहीत. यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीचा दर्जा हा डी वरून डी प्लस करावा अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. यावर उद्योगमंत्र्यांनी याबाबतच्या शासन आदेशात दुरूस्ती करून धुळे ऐवजी उत्तर महाराष्ट्र असा उल्लेख करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आता सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ट्रक टर्मिनस होणार
जळगावच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रक टर्मिनससाठी भुखंड आरक्षित करण्यात आला असून येथे टर्मिनस उभारण्यात यावे अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यावर ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव महामंडळाच्या धोरणानुसार दोन महिन्यात सादर करण्यात यावा असे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले.
धरणगाव तालुक्यात एमआयडीसीसी पाहणी करण्याचे निर्देश
धरणगाव तालुक्यातील मौजे जांभोरा येथील शासकीय जमीन ताब्यात घेऊन औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी दिली. याच्या सोबत आजच्या बैठकीत पाचोरा-भडगाव, मुक्ताईनगर, चोपडा येथे औद्योगिक क्षेत्राची उभारणी करावी. जळगाव येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारावे या मागण्यांनाही सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे.