लसीकरणासोबत झाडांचे रोप देऊन, दिला जातोय वृक्ष संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:05+5:302021-09-14T04:20:05+5:30
विघ्नहर्ता गणेश मित्रमंडळ जळगाव : तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळातर्फे मोठ्या जल्लोषात ...

लसीकरणासोबत झाडांचे रोप देऊन, दिला जातोय वृक्ष संवर्धनाचा संदेश
विघ्नहर्ता गणेश मित्रमंडळ
जळगाव : तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळातर्फे मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन, सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. यात कोरोनापासून बचावासाठी विघ्नहर्ता गणेश मित्रमंडळाने मनपा आरोग्य विभाग व युवा बिग्रेडिअर फाउंडेशनच्या मदतीने तळेले कॉलनी येथे लसीकरण शिबिर सुरू केले आहे. परिसरातील नागरिकांना या ठिकाणी कोरोना लस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे लसीकरणानंतर नागरिकांना झाडांचे रोप देऊन, वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून अक्षय महाजन तर उपाघ्यक्ष म्हणून वेदप्रकाश चौधरी हे काम पाहत आहेत.
जिद्दी मित्रमंडळ
रथ चौकातील जिद्दी मित्रमंडळातर्फे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार कुठलीही आरास न करता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मंडळाचे यंदाचे ४० वे वर्ष असून, अध्यक्ष म्हणून योगेश वाणी तर उपाध्यक्ष म्हणून नीलेश वाणी काम पाहत आहेत. मंडळातर्फे यंदा सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तदान शिबिर घेण्याचे नियोजन केले आहे. तसेच समाजातील अनेक गरजू विद्यार्थांना पुरेशे शैक्षणिक साहित्य नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे गरजू विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात येणार आहे. तसेच अन्नदानाचाही कार्यक्रम घेण्यात येणार असून, मास्क व सॅनिटायझरही वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.
दीपक तरुण मंडळ
रथ चौकातील दीपक तरुण मंडळाचे यंदाचे ४९ वर्ष आहे. मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात विविध प्रकारची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदींवर आरास सादर करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार मंडळातर्फे साध्या पद्धतीने श्री गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन, सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. यात सध्या शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यामुळे मंडळातर्फे परिसरात दररोज जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांना डेंग्यूपासून संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी व स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून सागर शिंपी तर उपाध्यक्ष म्हणून दीपक तांबट हे काम पाहत आहेत.