स्मृतीच्या वर्षावात आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:13 AM2018-06-18T01:13:25+5:302018-06-18T01:13:25+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये चंद्रकांत चव्हाण यांनी लिहिलेले ललित.

Memories in the Memorial | स्मृतीच्या वर्षावात आठवणी

स्मृतीच्या वर्षावात आठवणी

googlenewsNext




‘आठवणी’ एक छोटासाच, पण आपल्या आत अर्थाच्या अनेक संदर्भांना सामावून घेणारा शब्द. त्यात जगण्यातील आश्वस्तपण जसे सामावले असते, तसे आनंदाचे सोहळेही साठले असतात. त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या आणखी खोल जाणाऱ्या समुद्राच्या तळासारख्या. इहतलावर जीवनयापन घडताना इच्छा असो, नसो स्वत:ला अनेक रंगांनी रंगवून घ्यावे लागते. त्याच्या नानाविध छटांनी मढवून घ्यावे लागते. अशा रंगांनी मंडित स्मृतींचे इंद्रधनुष्य जीवनाचे रंग घेऊन प्रकटते. त्याने दिलेल्या रंगातून माणूस आपल्या आयुष्याचे रंग शोधत राहतो. सुख-दु:ख दिमतीला घेऊन मनाचं आभाळ भरून येतं. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे.
स्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आस्थेचा ओलावा शोधत उभे असते. बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. उत्क्रांतीच्या विकासक्रमात माणूस किती विकसित झाला, हा प्रश्न बाजूला सारून आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना मन उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं समृद्ध करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. या परगण्याचे सारेच सावकार असतात. येथे राव-रंक असा भेद नाहीच. सोबत करणाºया आठवणी कोणत्या, कशा असतील, हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या असतील, तशा स्वीकारून जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत राहतात. आठवणींनी जगणं श्रीमंत केलेलं असतं.
आयुष्याच्या प्रवासाची वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बºया-वाईट आठवणी उगीच रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणी आपलेपण घेऊन अंकुरतात. आस्थेची रोपटी वाढत जातात.
काळाने कोणाला जे काही दिले असेल, नसेल. त्याची समिकरणे सोडवत आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मन:पटलावर आठवणींची गोंदण नक्षी साकारत राहतात.
दिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेचा क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात.
मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरू असतो. रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात आठवणी. फुलांचा गंध साकळून वाºयासोबत वाहत राहतात.
कधी ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करीत राहतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण, दोन क्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात.
- चंद्रकांत चव्हाण, जळगाव

Web Title: Memories in the Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.