सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नीट परीक्षेच्या काही तासांआधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. परिणामी, सोमवारी नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले जाऊन त्याला मंजुरीही देण्यात आली; परंतु या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालवू शकतो. शिवाय देशातील विद्यार्थ्यांना जर तामिळनाडूतील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तो मिळविण्यास त्यांना अडचणी येतील, त्यामुळे हा निर्णय योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया तज्ज्ञ व विद्यार्थ्यांमधून उमटल्या.
०००००००००००
काय आहे तामिळनाडू सरकारचा निर्णय
नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच अशीच मागणी विद्यार्थी, पालक आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. या विधेयकाद्वारे सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.
काय म्हणतात... शिक्षणतज्ज्ञ
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडूच्या विधानसभेत पास झाले. यामुळे बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून याचा तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना तामिळनाडूतील महाविद्यालयात सीटस् मिळणार नाही. हे इतर राज्यातील मुलांसाठी नुकसानदायी ठरेल. वैद्यकीय प्रवेशासाठी देशात एकच व एकाच वेळी नीट परीक्षा होते; परंतु आता जर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी परीक्षा घेतली तर आधीसारखी परिस्थिती निर्माण होईल.
- डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ
०००००००००००
वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा ही गरजेची आहे. जर नीट नाही घेतली तर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावेल. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ही काटेकोरपणे राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेशाची यादी ही तीन ठिकाणी पाठवावी लागते. त्याठिकाणी पडताळणी होते. त्यानंतर मान्यता मिळते. म्हणून तामिळनाडू सरकारचा निर्णय योग्य वाटत नाही.
- डॉ. नारायण आरवीकर, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ
००००००००००
नीट परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले तर चांगले महाविद्यालय मिळते. त्यामुळे ही परीक्षा गरजेची आहे. नुकतीच आपण नीट परीक्षा दिली आहे.
- वेदांत साबळे, विद्यार्थी
०००००००००
कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे नीट ही परीक्षा होणे गरजेचे होते. बारावीत अनेक मुलांना ९० टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत. त्यामुळे चांगल्या हुशार मुलांच्या जागासुद्धा यामुळे जातील. म्हणून नीट परीक्षा रद्द करायला नको होती.
- युगंधर शैलार, विद्यार्थी