Mayor-elect on 7th | महापौर निवड २७ रोजी

महापौर निवड २७ रोजी

जळगाव : महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन महापौर निवडीसाठी २७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २१ पासून महापौरपदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, २४ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दरम्यान, भाजपाकडून भारती सोनवणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, इतर इच्छुकांची मनधरणी करण्यात आली आहे. पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळात इतरांना संधी दिली जाणार आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरपदी सीमा भोळे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांची निवड १० महिन्यांसाठी करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकींमुळे काही महिने मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर ७ जानेवारी रोजी भोळे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल १३ दिवसांनंतर नवीन महापौर निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
उपमहापौरांचा राजीनामा वाढदिवसानंतर ?
महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे देखील राजीनामा देतील असे वाटत होते. मात्र, पक्षाने त्यांना राजीनामा देण्याबाबत कोणत्याही सूचना दिल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
दरम्यान, २३ रोजी च्या वाढदिवसापर्यंत त्यांना पक्षाने मुदतवाढ दिली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. उपमहापौरांनी अद्याप राजीनामा दिला नसला तरी उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही इच्छुकांनी सोमवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतली.

असा आहे निवडीचा कार्यक्रम
महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २७ रोजी सकाळी ११ वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थिीतीत विशेष सभा होणार आहे. २१ ते २४ पर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.२७ रोजी सभा सुरु झाल्यानंतर अजार्ची छाननी होईल.छाननीनंतर १५ मिनिट माघारीसाठी मुदत आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार मतदान होईल.

Web Title:  Mayor-elect on 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.