‘जावळे’ सरांच्या क्लुप्त्यांमुळे अवघड गणित झाले सोपे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:32+5:302021-09-05T04:21:32+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गणिताचे नाव काढले की अनेकांच्या अंगावर काटा येतो, मोबाइल किंवा कॉम्प्युटरमधल्या ...

‘जावळे’ सरांच्या क्लुप्त्यांमुळे अवघड गणित झाले सोपे !
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गणिताचे नाव काढले की अनेकांच्या अंगावर काटा येतो, मोबाइल किंवा कॉम्प्युटरमधल्या कॅलक्युलेटरशिवाय आकडेमोड करायची म्हटले, तर मग घामच फुटतो! अवघड पाढे, समीकरणे यामुळे भीती आणखी वाढते. पण, शहरातील अविनाश जावळे या गणित शिक्षकाच्या 'क्यूब' पद्धतीमुळे अगदी अवघड वाटणारा गणित आता सोपा झाला आहे. चिमुकले विद्यार्थी अवघ्या तीस सेंकदात दोन किंवा तीन अंकी गुणाकार सोडवित असून त्यांना हा विषय आवडीचा झाला आहे.
आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत शिकवून त्याला चांगली नोकरी मिळावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, कोरोना महामारीमुळे शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे. अशा परिस्थितीत गरीब वस्तींमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य अविनाश जावळे करीत आहेत. जावळे आर्यन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक असून ते नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दरम्यान, गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक व पुस्तकी ज्ञानापेक्षा थोड वेगळे शिक्षण देण्याचे काम ते मागील तीन वर्षापासून करीत आहेत. गोरगरीब तीस विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले असून त्यांना ते गणिताच्या विविध क्लुप्त्या शिकविल्या आहेत. त्यात 'क्यूब' पद्धतीमुळे या विद्यार्थ्यांना अवघड गणित विषय हा सोपा झाला आहे. झटपट गणित सोडविण्यास या पध्दतीचा उपयोग आहे. त्या विद्यार्थ्यांना ५० पर्यंत क्युब तोंडी पाठ असून दोन ते तीन अंकी गुणाकार काही सेंकदात सोडवित आहेत.
काय आहे 'क्यूब' पद्धत
क्यूब म्हणजे घन एका क्रमांकाला त्याच क्रमांकाने तीन वेळ गुणाकार करून जे उत्तर मिळते, त्याला क्यूब असे म्हणतात. असे दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास पर्यंत क्यूब व शंभरपर्यंत वर्ग जावळे यांनी तोंडी पाठ करून घेतले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना कोणताही अंक दिला. आणि त्यांना त्यांचे क्यूब व वर्ग विचारले असता विद्यार्थी तोंडी पाठ त्याचे उत्तर देतात. या सोप्या पद्धतीच्या मदतीने विद्यार्थी अनेक तीन-दोन अंकीचे गुणाकार सेंकदात सोडवतात.
या विद्यार्थ्यांना मिळाले मार्गदर्शन
देवराज घेंगट, मोहित घेंगट, मोहित जावळे, निहाल गोयर, खुशी तेजी, शिखा गोयर, लावण्या जावळे, टीना घेंगट, स्वामी गोयर या सारख्या अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अविनाश जावळे यांनी मार्गदर्शन केले असून हे विद्यार्थी सहज गणित सोडवित आहेत.