एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:05+5:302021-02-05T06:00:05+5:30

बेफिकिरी : ना कोरोनाची भीती, ना बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी ...

Masks for ST drivers only | एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे

एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे

बेफिकिरी : ना कोरोनाची भीती, ना बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने, महामंडळातर्फे पूर्ण क्षमतेने बस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी बसवर ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असे पोस्टर्स लावले आहेत. मात्र, चालक-वाहकांकडूनच महामंडळाच्या या आवाहनाला चालक-वाहकांकडून हरताळ फासण्यात येत असल्याचे मंगळवारी लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. प्रवाशांप्रमाणे अनेक चालक-वाहक विनामास्क सेवा बजावीत होते.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली महामंडळाची सेवा आता सर्व मार्गांवर पूर्ववत सुरू झाली आहे. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, महामंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मास्कचा वापर करणाऱ्यांनाच बसमध्ये प्रवेश देण्याबाबत वाहकांना सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत चालक-वाहकच मास्क वापरताना दिसून आले नाही. तसेच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनाही मास्क वापरण्याबाबत कुठल्याही सूचना करताना दिसून आले नाहीत. प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत जळगाव आगारात दुपारी बाराच्या सुमारास बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांश बसमध्ये अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून आले. तसेच मास्क न वापरण्याबाबत काही चालकांना विचारले असता, त्यांनी चक्क कोरोना गेला असल्याचे उत्तर दिले. तर प्रवाशांनीही ९० टक्के कोरोना गेला असल्याचे उत्तर देऊन मास्कचा वापर बंद केला असल्याचे सांगितले.

इन्फो :

कोरोना असताना नेहमी मास्क वापरला. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना कमी झाल्याने मास्क वापरणे बंद केले आहे. जेथे गर्दी असते, तेथेच मास्क वापरतो. तसेच लस आल्यामुळे कोरोनाची थोडी भीतीही दूर झाली आहे.

- गौरव धांडे, प्रवासी

इन्फो :

बसमध्ये तिकीट काढताना मास्क वापरतो, इतर वेळी मात्र वापरत नाही. आता कोरोना भरपूर कमी झाल्यामुळे पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. मास्क वापरूनही श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे कमी प्रमाणात मास्कचा वापर करत आहे.

- मास्क न घातलेला वाहक, जळगाव आगार

इन्फो :

गर्दीच्या ठिकाणीच मी मास्क वापरतो, बस चालविताना मास्क वापरण्याची गरज नसते. तसेच आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रवासीदेखील मास्क वापरत नाहीत. तसेच वाहकांनी सांगितल्यावरही प्रवासी ऐकत नाहीत.

- मास्क न घातलेला चालक, जळगाव आगार

Web Title: Masks for ST drivers only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.