बोरीला आलेल्या पुराने अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:07+5:302021-09-07T04:20:07+5:30
पारोळा : तामसवाडी, ता. पारोळा येथील बोरी नदीवरील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने बोरी धरणाने दिनांक ...

बोरीला आलेल्या पुराने अनेक गावांचा संपर्क तुटला
पारोळा : तामसवाडी, ता. पारोळा येथील बोरी नदीवरील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळदार पाऊस झाल्याने बोरी धरणाने दिनांक ५ रोजी धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने रात्री धरणाचे सर्व १५ चे १५ गेट उघडण्यात आले.
१३ हजारांचा वर क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. यामुळे बोरी धरणाला मोठा पूर आला होता. पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
पुराच्या या गावांना बसला फटका
करमाड बु., ता. पारोळा या गावाला धरणाच्या बँक वॉटरचा सर्वात मोठा फटका बसला. बँक वॉटरचे पाणी या गावातील काही घरांत घुसून त्यांचे नुकसान झाले. या १० ते १२ घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. रात्री पावसाचा असाच जोर कायम राहिला असता तर करमाड बु. गावात अनेकांच्या खळवाडीत, गोठ्यात व घरांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले असते. सुदैवाने पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला व करमाड बु. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. धरणाची निर्मिती झाल्यानंतर बोरी धरणाच्या बँक वॉटरचा या करमाड बु. गावाला मोठा धोका पोहोचू शकतो. हे गृहीत धरून प्रशासनाने या गावचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते; पण या गावाच्या काहींना हे स्थलांतर रुचले नाही. मग काही लोकांनी प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी स्वतःहून स्थलांतर करून घेत करमाड खु. या गावात राहणे पसंत केले. मग जे राहून गेले ते करमाड बु. गावात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या करमाड बु. गावाला जर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तर येथील ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा नेहमी वाजत असते. रात्री बँक वॉटरमुळे तालुक्याशी संपर्क असलेली संपर्क फरशीदेखील पाण्याखाली आली होती. या गावाचा चौफेर संपर्क यामुळे तुटला होता. एक भीतीचे वातावरण रात्रभर ग्रामस्थांच्या मनात होते.
बोरी नदीवरील सर्व केटिवेअर हाऊसफुल
बोरी नदीवर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक केटिवेअर केले. त्यात तामसवाडी गावानजीक नाथबुवा मंदिराजवळ, टोळी गावानजीक, मोंढाळे पिंप्री गावानजीक, असे मोठमोठे केटिवेअर बांधले होते. हे सर्व केटिवेअर पूर्ण भरले आहेत. यामुळे भविष्यात याचा मोठा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास निश्चित मदत होईल. याशिवाय बहादरपूर, महाळपूर, भिलाली येथील ही केटिवेअर फुल झाली आहेत.
टोळी येथे प्राचीन संरक्षण भिंत पुरामुळे खचली
बोरी नदीच्या काठाला वसलेल्या टोळी गावाला या बोरी नदीच्या पुराचा फटका बसला. नदीच्या पुराच्या पाण्यापासून गावाचे नुकसान होऊ नये यासाठी नदीकाठाला प्राचीन अशी संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. ती भिंत या पुराच्या पाण्यामुळे खचली आहे. मराठी शाळेच्या इमारतीकडून बाजूच्या वस्तीत पाणी शिरले आहे. टोळी गावाला संरक्षण भिंत ही ब्रिटिशकालीन आहे. ती नदीच्या पुरामुळे पडली असून संरक्षण भिंतीला लागून अंगणवाडी आहे. तिचाही काही भाग खचल्याने ती पडण्याची शक्यता आहे. केटिवेअरच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. बंधाऱ्याचा साइड भरावसुद्धा वाहून गेला.