ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी चोपडा तालुक्यात थाटली कार्यालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:56 IST2017-11-14T18:48:54+5:302017-11-14T18:56:56+5:30
चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली संथ गतीने सुरू असतांना मात्र बाहेरील तब्बल आठ कारखान्यांनी शेतकºयांचा ऊस मिळविण्यासाठी कार्यालये थाटून ऊस घेऊन जायला सुरूवात केली आहे.

ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी चोपडा तालुक्यात थाटली कार्यालये
लोकमत आॅनलाईन
चोपडा, दि.१४ : तालुक्यातील ऊस पळविण्यासाठी बाहेरील अनेक कारखान्यांनी परिसरात कार्यालये थाटली असून या पार्श्वभूमीवर चोसाकाचे संचालक मंडळ शेतकºयांपर्यंत कधी पोहचणार असा सवाल केला जात आहे.
महाराष्टÑात यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदाचा गाळप हंगाम चालविण्यासाठी सर्वच साखर कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार आहे. हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद ता. सटाणा येथील द्वारकाधीश साखर कारखाना, नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील पुष्पदंतेश्वर, औरंगाबाद जिल्हयातील कन्नड येथील साखर कारखाना, सिल्लोड येथील सिद्धेश्वर, जळगाव जिल्ह्यातील फैजपूरचा मधुकर , कोपरगाव येथील संजीवनी, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील मुक्ताई शुगर अँड पॉवर एनर्जी साखर कारखाना, शहाद्याचा सातपुडा कारखाना आदी बाहेरील कारखान्यांनी शहरात व ग्रामीण भागात कार्यालये थाटली आहेत, एव्हढेच नाही तर फैजपूर येथील मधुकर कारखान्याने ‘चोसाका’ कार्यक्षेत्रात ऊसतोड करणाºया मजुरांच्या टोळ्या उतरवून ते ऊस घेऊन जात आहेत.
वास्तविक ‘चोसाका’चे बॉयलर अग्नी प्रदीपन होणे बाकी आहे, त्यात यंदा गाळप सुरु होण्याच्या काहीच हालचाली दिसत नसल्याने शेतकरी आपला ऊस बाहेर तर देत नसावा ना ? अशी शंका निर्माण झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ द्यायचा नसेल तर गाळप सुरु होण्यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे. सध्या तरी गाळपाची साशंकता असल्याने ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत, म्हणून लवकर ऊस बाहेरील कारखान्याना पाठवून शेत मोकळे करण्याचे तो योजत असल्याचे बोलले जात आहे.